आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन गावप्रमुख दुलाजी परब यांसह सरपंच, सदस्य व अनेक कार्यकर्ते शिवसेनेत
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्रावण गावात उबाठा गटाला खिंडार पाडले. श्रावण गावप्रमुख तथा उबाठा गटाचे उपसरपंच दुलाजी परब यांच्या नेतृत्वाखाली सरपंच नम्रता मुदाळे तसेच ग्रा. पं. सदस्य सुविधा परब, लक्ष्मीकांत मुद्राळे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना विभागीय संपर्क प्रमुख तथा मठबुद्रुक उपसरपंच विनायक बाईत यांच्या पुढाकारातून श्रावण येथील लिंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. मागील दहा वर्ष गावचा रखडलेला विकास येत्या दोन वर्षात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावण्याचा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिला आहे. दरम्यान यापुढेही पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच राहील असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख महेश राणे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, बाळासाहेब कुबल, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी जिप सभापती अनिल कांदळकर, छोटू ठाकूर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, बाबू परुळेकर, प्रशांत परब, निलेश बाईत, अविनाश राऊत, मठबुद्रुक सरपंच बाळा वेंगुर्लेकर, उपसरपंच विनायक बाईत, शिरवंडे सरपंच चैत्राली गावकर, उपसरपंच राजू गावकर, निरोम सरपंच राजू राऊत, सुशांत घाडीगांवकर, मकरंद राणे, मिहीर राणे, बाबू परब, राजू बिडये, मंदार लुडबे, भाऊ मोरजे, विभागप्रमुख सुनील घाडीगांवकर, काका गावडे, शाखाप्रमुख संतोष परब, दीपक चव्हाण, ओंकार पवार, महेश दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय गवळी, प्रतिक सावंत, मंगेश यादव, भाऊ राऊत, दीपक घाडी, शाखा प्रमुख स्वप्नील दळवी, गुरु घाडी यांच्यासह अन्य ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळू कुबल यांनी केले. गाव विकास व रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात याबाबत विचार मांडले.

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, श्री देव लिंगेश्वरानेच हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. 1990 पासून या गावात आम्ही यायला लागल्यानंतर दुलाजी परब यांनी खूप मदत केली. दुलाजी यांनी पक्ष सोडला तरी आमच्या नात्यात फरक पडला नाही. दुलाजी परब व सहकाऱ्यांनी पक्ष प्रवेश करताना आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मागणी केली नाही. केवळ निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून या गावातील रस्ते व अन्य प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळात गावात रोजगार देण्यासाठी प्रयत्न राहतील. राणेसाहेब, निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे चारही नेते आपले आहेत. त्यामुळे योग्य समन्वय साधून काम केले तर दहा वर्षात जो विकास दिसला नाही तो या दोन वर्षात दिसेल. याठिकाणी रोजगार देण्यासाठी निलेश राणे प्रयत्न करीत आहेत, असे सांगितले.
दुलाजी परब यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल. ते जी जी कामे देतील, ती कामे निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू. तसेच रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करू. आमदार राणे यांनी दोन महिन्यात जी कामे केली आहेत, ती पाहता आगामी काळात विकासाचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी संजय आग्रे म्हणाले, आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शिवसेनेत प्रवेशाची रांग लागली आहे. आ. निलेश राणे यांना हा मतदार संघ पहिल्या पाच क्रमांकात आणायचा आहे. उद्योग रोजगार आणण्यासाठी निलेश राणे प्रयत्न करीत आहेत. आपल्या गावच्या समस्या सोडवण्यासाठी देखील आम्ही कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

दुलाजी परब यांच्यासोबत आपुलकीचे नाते : दत्ता सामंत
दुलाजी परब आणि आपले 1990 पासून आपुलकीचे नाते आहे. हे नाते पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने एकत्र आले. दुलाजी परब आज आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या विभागातील विजय निश्चित झाला आहे, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

