मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दोघांना अटक
मालवण | प्रतिनिधी : देशाच्या विरोधात घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरात आडवण येथे वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह महिला व एका अल्पवयीन मुलाविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायीकांसह याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे.
वराडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेतून काल रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना रात्रौ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान त्यातील एक मुलगा हा भारत देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला. त्यानंतर तो मुलगा हनुमान मंदिर येथे दिसला. त्याला पुन्हा विचारले असता त्याने आपल्या वडिलांना भेटा असे सांगितले. त्याच्या वडिलांची भेट घेत माहिती दिली असता त्यांनीही देशाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली. याची माहिती वराडकर याने मित्र हरेश पडते याला दिल्यानंतर घटनास्थळी भाऊ सामंत, संतोष लुडबे, विजय केनवडेकर, आवि सामंत, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, यांच्यासह हिंदू बांधव जमा झाले. सर्वांनी त्या भंगार व्यवसायिकांना देशाच्या विरोधात घोषणा देणे योग्य नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये आडवण येथील किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.
*वकीलपत्र कोणी घेतले नाही*
आडवण येथील भंगार व्यावसायिक किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान या दोघांना अटक करून मालवण पोलिसांनी न्यायलायत हजर केले. मात्र त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नसल्याने दोघांही संशयित आरोपीना सावंतवाडी कारागृहात नेण्यात आले. मंगळवारी पुन्हा त्या दोघांना मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

