आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही घेतले दर्शन
मालवण : आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रौत्सवात उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेतले. शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही दर्शन घेतले. दरम्यान, सकाळी आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक यांनी देवीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, आम्हा राणे कुटुंबाला जे काही मिळालं ते देवीच्या आशीर्वादाने मिळाले आहे. या यात्रेत राज्यातून नव्हे तर देशातून भाविक येतात. दरवर्षी यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढती आहे. त्यामुळे येथील प्रश्न सुद्धा वाढत आहेत. येथे पाण्याचा प्रश्न मोठा आहे. नळपाणी योजनेसाठी आवश्यक निधी मिळावा, यात्रेत मोबाईल नेटवर्क मिळत नाही.
मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या जागेच बक्षीस पत्र देण्यास येथील ग्रामस्थ तयार आहेत. येथे खासगी कंपनीचा टॉवर आणि येथील महत्वाचे सर्व प्रश्न महायुतीच्या माध्यमातून मार्गी लावणार अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी एकत्रित भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री. सामंत म्हणाले, या मतदार संघाचे आमदार निलेश राणे व्हावेत ही देवीची इच्छा होती. मी पालकमंत्री असताना सुद्धा येथील विकासासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येथील आमदार निलेश राणे जी विकासकामे सांगतील ती कामे पूर्ण करण्याची ग्वाही सामंत यांनी दिली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

