स्वागतकक्ष व मोफत ऑनलाईन दाखले यां माध्यमातून भाजपा यात्रौत्सवात भाविकांच्या सेवेत
अनेक नेतेमंडळी देवीच्या दर्शनासाठी येणार
मालवण | प्रतिनिधी : आंगणेवाडी श्री भराडी मातेवर जशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे तशी भाजपा नेते, कार्यकर्त्यांची अपार श्रद्धा आहे. दोन वर्षांपूर्वी आंगणेवाडी यात्रेत भाजपचा भव्य मेळावा देवीच्या कृपेनें संपन्न झाला. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा जनाधार मिळाला. पहिल्यांदाच भाजपचे खासदार नारायण राणे विजयी झाले. त्याच पाठोपाठ विधानसभेत महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. मालवण कुडाळ मध्ये दहा वर्षांनी महायुतीचे आमदार निलेश राणे विजयी झाले. पदवीधर, शिक्षक निवडणुकीतही यश मिळाले. त्यामुळे विजयाची ही घोडदौड आई भराडीच्या कृपेने यापुढेही कायम राहील. अशी भावना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आंगणेवाडी येथे बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षे आंगणेवाडीत स्वागत कक्ष सुरू आहे. तो असाच सुरू राहणार आहे. गतवर्षी प्रमाणे या स्वागत कक्षात सर्व सामान्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले, आधार कार्ड नोंदणी, अपडेट सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. असेही प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
भराडी मातेच्या यात्रेस खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पालकमंत्री नितेश राणे, मंत्री आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, आमदार, मुंबईतील आजी माजी नगरसेवक यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गुरुवारी आंगणेवाडी येथे भेट स्वागतकक्ष व अन्य सेवेचा आढावा घेतला. त्या नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू वराडकर, विजय निकम, विरेश पवार आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले. दोन वर्षांपूर्वी आंगणेवाडी यात्रेत भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भराडी मातेच्या आशीर्वादाने कोकणात प्रथमच भाजपचे खासदार निवडून आला. त्यानंतर शिक्षक पदवीधर मतदार संघातही यश मिळाले. विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. भराडी मातेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुख-समृद्धी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ही भाजपा युतीची विजयी घोडदौड भराडी मातेच्या आशीर्वादाने कायम राहील अशी आपली श्रद्धा आहे.
पंतप्रधान आवास लाभार्थ्यांना देवी पावली
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. यात सिंधुदुर्गातील सुमारे १२ हजार घरांचा समावेश आहे. यात योगायोग म्हणजे भराडी मातेच्या यात्रे दिवशीच म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी संबंधितांना घरकुल मंजुरीचे पत्र तसेच पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. नवसाला पावणारी देवी भाजपा युती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्यांची हक्काची घरे मिळवून देण्यासाठी पावली आहे. असेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले.

