महाराजांच्या पुतळ्याचा 'पायाभरणी समारंभ' किल्ले राजकोट येथे संपन्न
शिवसृष्टी उभारणी लवकरच : आ. दीपक केसरकर
मोठया दिमाखात महाराजांचा पुतळा उभारणी होईल : आ. निलेश राणे
मालवण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असेल. जगभरातून पर्यटक, शिवप्रेमी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील. असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथील किल्ले राजकोट येथे व्यक्त केले.महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी होत आहे. शिवजयंती दिनी राज्याचे मत्स्यव्यावसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा संपन्न झाला.

यावेळी जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, बांधकाम विभाग अभियंता महेंद्र किणी, सहायक अभियंता अजित पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांसह भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिवलकर, संजू परब, विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेजर, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, दीपालक्ष्मी पडते, सोनाली पाटकर, अंजना सामंत, ऋषिकेश सामंत शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी कोनशीलेचे अनावरणही करण्यात आले. महाराजांचा पुतळा उभारणी करणारे मे. राम सुतार आर्ट क्रियेशन वतीने महाराजांची प्रतिकृती पालकमंत्री नितेश राणे यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्री म्हणाले, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनविण्यात येणार आहे तो कसा बनतोय, कोण बनवतोय याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडावी असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. महाराष्ट्रातील जनतेचीच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमाकडे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांची किर्ती संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. हा सोहळा शासन प्रतिनिधी म्हणून आमच्या माध्यमातून होतोय याबद्दल आम्ही सर्वजण स्वत:ला नशिबवान समजतो असेही ते म्हणाले.

पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रक्रीयेच्या पहिल्या दिवसापासून ते हा पुतळा कसा बनावा, त्याची डिझाईन कशी असावी, पुतळा कोणी बनवला पाहिजे, त्याची तांत्रिक बाबी काय असल्या पाहिजेत याबाबत अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. यासाठी अनेक बैठका मंत्रालयस्तरावर होत आहेत. पालकमंत्री म्हणून मी या कार्यक्रमास उपस्थित असलो तरी हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेत्वृत्वाखालीच होत आहे. दोन आठवड्यापुर्वी राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुतळा उभारणीबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. पालकमंत्री म्हणाले की, हा पुतळा जगविख्यात जेष्ठ मुर्तीकार राम सुतार बनविणार आहेत. त्यांच्या कामाबद्दल फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगभरामध्ये कौतुक आहे. गुजरात मध्ये असणारा सरदार वल्लभ भाई पटेलांचा 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' म्हणून ओळखला जाणारा भव्य पुतळा देखील राम सुतार यांनी बनविलेला आहे. शिवाय दादर येथील इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक उभं राहणार आहे ते देखील राम सुतारच उभारणार आहेत. अशा या महान व्यक्तीकडून आपण हा पुतळा उभारणार आहोत. या पुतळा उभारणीमध्ये महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे. आमदार निलेश राणे यांनी महाराजांचा पुतळा उभारणी नंतर सुरक्षिततेबाबत, तटबंदीबाबत तसेच या भागाच्या विकासासाठी सूचना केलेल्या आहेत. मी त्यांना विश्वास देतो की, त्यांनी केलेल्या सर्व सुचनांची पुर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राजकोट परिसरातील सुरक्षितता, सुशोभिकरण या सर्व गोष्टीवर फार बारकाईने लक्ष देणे महत्वाचे आहे. आमदार दिपक केसरकर यांच्या सूचनेनूसार पुतळ्याचा बाजूला 'शिवसृष्टी' उभा केली तर पुतळा पाहण्यासाठी जे शिवप्रेमी येथे येतील त्यांना शिवरायांचा इतिहास व शिवरायांबद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होईल. या परिसरामध्ये ते जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील या दृष्टीकोनातून 'शिवसृष्टी' हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी प्रशासन बैठका घेत आहे. संबंधित जमीन मालकांसोबतही चर्चा सुरु आहे. पुतळा उभारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर लगेच 'शिवसृष्टी' उभा करण्याचे कामही सुरु होईल असा विश्वासू मी देतो असेही ते म्हणाले.

विरोधकांचा घेतला समाचार
विरोधकांनी नेहमीच राजकारण केले. गतवर्षी जी वेदनादाई पुतळा दुर्घटना घडली त्यावेळी सर्व विरोधकांनी फोटोसेशन आणि राजकारण केले. त्याचे पुतळा उभारणीत योगदान शून्य आहे. जयंती दिनी महाराजांना श्रद्धांजली वाहणाऱ्या राहुल गांधी ला तर चपलाने मारले पाहिजे. यांना महाराष्ट्र भूमीत पाय ठेवण्याचा अधिकार आहे का? अश्या संतप्त भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केले. ते म्हणाले या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. या पुतळा उभारण्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमित केलेले आहेत. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर सुरू असून आजमितीस पुतळ्याचे १० फूट उंचीचे आरसीसी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची 83 फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात येत असल्याचेही श्री किणी यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनीही विचार मांडले.

शिवसृष्टी उभारावी : आ. दीपक केसरकर
आमदार दिपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक उपक्रम राबवित आहे. नाविक दलाची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दखल घेऊन नौदलाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. किल्ले राजकोट बाजूला असलेल्या जागेत शिवसृष्टी व्हावी. शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे. आपले राज्य सरकार पालकमंत्री नितेश राणे गतिमान कार्यवाही करतील असेही ते म्हणाले.*सर्वोत्तम दर्जा पाहता मोठया दिमाखात महाराजांचा पुतळा उभारणी होईल : आमदार निलेश राणे* आमदार निलेश राणे म्हणाले ज्या दैवतामुळे आपली ओळख आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला कळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजकोट येथे मागील वर्षी जी दुर्घटना घडली तो घातपात होता. आता महाराजांचा पुतळा उभारणी नंतर परिसरातील सुरक्षेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. या परिसरात पेालिस बंदोबस्त, लाईट, आणि सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. तसेच आता महाराजांचा पुतळा उभारणी होत असताना जो सर्वोत्तम दर्जा पाहता मोठया दिमाखात हा पुतळा उभा राहील. असाही विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचे विशेष कौतुक
राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यनातून महाराजांचा पुतळा उभारणी होत असताना कार्यकारी अभियंता अतिशय चांगले काम करतं आहेत. आपले सर्वोत्तम देण्याचा ते प्रयत्न करतं आहेत. असे सांगत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचे विशेष कौतुक केले. फोटो : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा 'पायाभरणी समारंभ' किल्ले राजकोट येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

