संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी येथील रहिवासी तथा गवंडी कारागीर अरुण आबा कासले (६२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने विरण येथील बाजारपेठेत पडल्याने जागीच निधन झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वा. दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की वडाचापाट बौद्धवाडी येथील अरुण कासले हे मंगळवारी सकाळी आपली तब्येत बरी नसल्याने पोईप येथील खासगी दवाखान्यात आले होते. उपचारानंतर ते पायी चालत पोईप वरून विरण येथे येत असता येथील बाजारपेठेतील दत्त मंदिरासमोर अरुण कासले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने ते रस्त्या शेजारी कोसळले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तपासणीअंती त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. कासले या परिसरात मजुरी व गवंडी काम करून आपल्या उदरनिर्वाह चालवत होते. वडाचापाट येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत होते. ते या परिसरात मनमिळाऊ स्वभावाने परिचित होते. घटनेची माहिती मिळताच वडाचापाट पोलीस पाटील विजय पालव, मसदे कोतवाल अनिकेत कासले, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, अमित कुशे, अमित प्रभुदेसाई, व स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सहकार्य केले. अरुण कासले यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ, भावजई, पुतणे, बहिणी असा परिवार आहे. एसटीचे सेवानिवृत्त वाहन तपासणीस विजय कासले यांचे ते बंधू होत त्यांच्यावर मंगळवारी दुपारी वडाचापाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडाचापाट येथील वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
