ऍड. पवित्रा धुरी-परब यांचा युक्तिवाद
निलेश जोशी | कुडाळ : मुलीला दगड मारुन जखमी केले आणि शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली या आरोपातून आरोपी बाबाजी राजाराम शिंदे, द्रौपदी बाबाजी शिंदे, गौरी सुनिल शिंदे आणि लक्ष्मण सुनिल शिंदे यांची कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपी तर्फे अॅड. पवित्रा प्रसाद धुरी-परब यांनी काम पाहिले.
या बाबत हकीकत अशी, आकेरी- देऊळवाडी येथे दि. १६ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी योगेश श्रीराम देऊलकर हे त्यांचे शेजारी राहणारे महादेव पटवर्धन हे आजारी असल्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना आरोपी बाबाजी शिंदे यांनी योगेश देऊलकर यांना घाणेरडी शिवीगाळ केली व फिर्यादी योगेश देऊलकर यांची मुलगी रेणुका योगेश देऊलकर हि आरोपी शिवीगाळ करीत असलेबाबत मोबाईलवर व्हिडीओ शुटींग करीत होती. त्याचा राग आल्याने आरोपी क्र.२ द्रौपदी शिंदे हिने तिचेवर दगड फेकून मारला व तिला जखमी केले. ठार मारण्याची धमकी दिली आणि घाणेरडी शिवीगाळ केली. कुडाळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला. त्या प्रमाणे आरोपी बाबाजी राजाराम शिंदे, द्रौपदी बाबाजी शिंदे, गौरी सुनिल शिंदे, लक्ष्मण सुनिल शिंदे यांचे विरुध्द दोषारोपपत्र कुडाळ न्यायालयात पाठविले होते.
कुडाळ न्यायालयात सदर खटला चालून आरोपी बाबाजी राजाराम शिंदे, द्रौपदी बाबाजी शिंदे, गौरी सुनिल शिंदे, लक्ष्मण सुनिल शिंदे या चारही आरोपींविरुध्द गुन्हा शाबित झाला नाही या कारणावरुन न्यायालयाने या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. चारही आरोपी यांचे तर्फे अॅड. पवित्रा प्रसाद धुरी-परब यांनी काम पाहिले.

दगड मारून जखमी केल्याच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता
