मालवण | प्रतिनिधी : मुंबई नायगाव-वडाळा विधानसभा मतदारसंघातून सलग 9 टर्म आमदार म्हणून विजयी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले मालवणचे सुपुत्र भाजपाचे जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या हस्ते करण्यात आला.
सिंधुदुर्ग दौऱ्यात मालवण येथील निवासस्थानी आलेल्या आ. कालिदास कोळंबकर यांनी मालवण नगरपरिषदेला भेट दिली. विकास प्रकल्प व पालिकेच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, परशुराम पाटकर, पालिका अधिकारी सुधाकर पाटकर, महेश परब, सोनाली हळदणकर,
भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आ. कालिदास कोळंबकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. विकासकामात त्यांचे योगदान नेहमीच राहिले आहे. आता आमदार निलेश राणे यांची साथ पालिकेला लाभत आहे. त्याच प्रमाणे सहकार्य आ. कोळंबकर यांचे नेहमीच मिळाले. असेही मुख्याधिकारी यांनी सांगितले. तसेच मालवण नगरपरिषदेच्या कामकाजची माहिती दिली. यावेळी मुंबई बीडीडी चाळ, पोलीस वसाहत, गिरणी कामगार प्रश्न यासह अनेक सामाजिक प्रश्न आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोडवले असे सांगत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव यावेळी उपस्थितानी केला.
अशक्य शब्द माहीतच नाही
आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले, माझ्यासाठी जनसेवा हेच पाहिले कर्तव्य आहे. जनसेवा करतं असताना होणार नाही हे वाक्य कधी आले नाही. अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोषात नाही. असे सांगताना आ. कालिदास कोळंबकर यांनी मालवण शहरातील रेवताळे फाटक शाळा, टोपीवाला हायस्कुल येथे शिक्षण घेत असताना त्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच पालिकेच्या विकास कामात नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचा मालवण नगरपरिषदेत सत्कार
