शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मालवण राजकोट किल्ला येथे समारंभ
मालवण | प्रतिनिधी : किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी होत आहे. शिवजयंती दिनी राज्याचे मत्स्यव्यावसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा 19 फेब्रुवारी सकाळी 11 वा. संपन्न होणार आहे.
यावेळी खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, यांची प्रमुख उपस्थिती तर सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि. यांच्या वतीने पुतळा उभारणी केली जात आहे. सुमारे 31 कोटी 75 लाख निधीला प्रसासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर 10 एप्रिल पर्यत पुतळा उभारणी पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात महाराजांचा पुतळा उभारणी हे काम अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे हे महाराजांचा पुतळा उभारणी कामावर विशेष लक्ष ठेवून सातत्याने आढावा घेतला जात आहे. तसेच संपुर्ण कामाचा दर्जा सर्वोत्तमच असावा यावर पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष लक्ष आहे.
*महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून 93 फूट उंची*
कांस्य धातू पासून भव्यदिव्य स्वरूपात जमिनीपासून 93 फूट उंच महाराजांचा पुतळा उभारणी होणार आहे. मजबूत स्वरूपात भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
फोटो : किल्ले राजकोट येथे उभारणी होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा असा असणार आहे. (अमित खोत, मालवण)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचा आज पायाभरणी सोहळा
