जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : महान योद्धा, आदर्श शासक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांचा प्रचार व राष्ट्र प्रेमाचा संदेश देण्यासाठी मालवण शहरात 'जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत' या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने आभासी उद्घाटनाने सर्व जिल्ह्यातील पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे. मालवण येथे टोपीवाला हायस्कुल येथून ढोलताशांच्या गजरात सुरु होणाऱ्या या पदयात्रेची मालवण शहरातुन राजकोट येथे सांगता होणार आहे. शिवप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यां सर्वांची उपस्थिती असणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालवण नगरपरिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, किल्ले राजकोट येथे 19 फेब्रुवारी सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशीही माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली.
पदयात्रेसंदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील पालिकेच्या सभागृहात नियोजन बैठक ही घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, सहाय्यक अभियंता अजित पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रा. एम आर खोत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा निघतील. सिंधुदुर्ग जिल्हयाचा कार्यक्रम मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मे. राम सुतार आर्ट क्रियेशन प्रा. लि. यांच्या वतीने
सुरु आहे. याबाबतही जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. जमिनीपासून 93 फूट उंच असा उभारणी होणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून दर्जेदार पद्धतीने भव्यदिव्य स्वरूपात विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
फोटो : जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (अमित खोत, मालवण)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मालवणात भव्य पदयात्रेचे आयोजन
