कॉम्रेड विजय कुलकर्णी यांचे आवाहन
कुडाळ मध्ये गिरणी कामगार मेळावा
कुडाळ : गिरणी कामगार व वारसांना मुंबईत मोफत घर देऊन पुनर्वसन करा. दिनांक १५ मार्च २०२४चा शासन निर्णय (जीआर) रद्द करा एन.टी.सी. गिरण्यांची जमीन ताब्यात घेऊन त्यावर घरे बांधा. या न्याय्य मागणीसाठी सहा मार्चला मुंबईत आजाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चाला गिरणी कामगारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते कॉमेड विजय कुलकर्णी यांनी रविवारी झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात केले.
सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार त्यांचे वारसदार व त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएस ९५ निवृत्ती वेतन धारकांचा संयुक्त मेळावा आज बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळेश्वर मंदीर शेजारी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉमेड विजय कुलकर्णी, कॉमेड बी. के. आंब्रे, कॉमेड संतोष मोरे ईपीएस 95 पेन्शन धारक महाराष्ट्र राज्य महासंघ उपाध्यक्ष कॉ गंगाराम भोसले (पुणे)प्रमुख वक्ते अनंत मालप पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक शांताराम परब, सुनील निचम, आनंद भोगन तसेच गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कॉमेड श्री कुलकर्णी म्हणाले महाराष्ट्र सरकारने १५ मार्च, २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे व त्याऐवजी एमएमआरडीए च्या क्षेत्रात घरे देण्यासंबंधी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे मुंबई पासून सुमारे १०० किलोमीटर लांब असलेल्या ठाणे जिल्हयातील शेलु तसेच वांगणी येथे पडीक जमिनीवर गिरणी कामगारांची घरे देण्यासंबंधी विकासकांची नेमणूक केलेली आहे व ती घरे घेण्यासबंधी गिरणी कामगार वारसदारांना सांगण्यात येत आहे, ही एक प्रकारे गिरणी कामगार वारसदारांची फसवणूक आहे. सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने सातत्याने गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत याबाबत आंदोलने केली जात आहे.
आजही मुंबईच्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध आहेत, इतरही जमिनी आहेत, त्या बिल्डरांना नफा कमविण्याकरीता द्यायच्या व गिरणी कामगार व वारसदारांना ग्रामीण भागात पडीक जमिनीवर घरे द्यायची, तीसुद्धा भरमसाठ किंमतीत द्यायची, या धोरणाच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत मोठे तीव्र आंदोलन करण्याबाबतची रूपरेषा या मेळाव्यात जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सहा मार्चला अधिवेशन काळात सरकारला जाग येण्यासाठी आता गप्प बसून चालणार नाही अन्यायाच्याविरुद्ध सातत्याने आवाज उठवला पाहिजे गेले कित्येक वर्षे गिरणी कामगार हा अन्याय सहन करत आलेला आहे आता गप्प राहिल्यास आपण लाभापासून वंचित होणार आहोत या शासनाला जाग येण्यासाठी आता हजारोच्या संख्येने सहा मार्चला मुंबई आझाद मैदानात होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असे आवाहन केले याबरोबरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधील निवृत्ती धारकांची (ईपीएस ९५ पेन्शनर्स) फसवणूक केंद्र सरकारकडून केली जात आहे, त्याबाबतही माहिती दिली जाणार असून पुढील लढ्याची दिशाही जाहीर करण्यात येणार आहे. असे सांगितले.

