ग्रामस्थांकडून श्रमदान : जंगलमय मार्गावर स्वच्छता मोहीम
स्काय न्यूज टुडे | आचरा : डाळपस्वारीचा उत्सव संपला अन् आचरावासिय आपापल्या कामधंद्यात रमून गेले. अशातच श्री देव रामेश्वर तब्बल ४० वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर शाही भेटीसाठी रवाना होणार असल्याने गावात पुन्हा एकदा चैत्यनमय वातावरण निर्माण झाले आहे. आचरा ते कुणकेश्वर असे जात असताना 'श्रीं' ची स्वारी आपल्या पूर्वपार पारंपारिक मार्गाने जाणार असल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून देवाचे पारंपारिक मार्ग चकाचक केले.

या श्रमदान मोहिमेत महिला, पुरुष, ज्येष्ठ, तरुण असे सुमारे २०० हून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. संस्थानिक इनामदार श्री देव रामेश्वर राजेशाही थाटात श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रुवारी रोजी भेट देणार आहेत. शुक्रवारी आचरा डोंगरेवाडी, पारवाडी, नागोचीवाडी येथील दोनशेहुन अधिक ग्रामस्थांनी एकत्र येत पारवाडी ते कारिवणे घाटी या जंगलमय बनलेलला पारंपारिक मार्ग साफसफाई करण्याचे काम हाती घेतले होते.

दिवसभर चाललेल्या या साफसफाई मोहिमेत झाडाझुडपांनी अडवलेला रस्ता पुर्णतः साफ, स्वच्छ केला गेला. यावेळी दुपारी ग्रामस्थांनी एकत्र बसून वनभोजनाचा आनंद घेतला. जेवणाची व्यवस्था आचरा गावचे सुपुत्र कणकवली येथील उद्योजक आबा दुखंडे यांनी केली. फोटो : कुणकेश्वर भेटीसाठी जाणाऱ्या श्री देव रामेश्वराची स्वारीच्या पारंपारिक मार्गावर ग्रामस्थांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली.


