पुतळा उभारणी कामाचे ब्रांझचे भाग नोयडा गाझीपूर येथून मालवणात दाखल
प्रत्यक्ष पुतळा उभारणी कामास लवकरच सुरवात
मालवण | प्रतिनिधी : किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येत आहे. या कामाच्या फाउंडेशनचे (चौथरा) काम पुर्ण होत आले आहे. दरम्यान चौथऱ्यावर ब्रांझ पासून बनवण्यात येणाऱ्या खडकावर 60 फूट उंच प्रत्यक्ष पुतळा उभारण्यात येणार आहे. यातील खडकाच्या कामाचे तीन मोठे भाग नोयडा गाझीपूर येथे तयार करून मालवण येथे आणण्यात आले आहेत.
राज्य सरकारने किल्ले राजकोट याठिकाणी ६० फुट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदाची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा तयार होत आहे. अशी माहिती बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.

डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फुट इतकी असणार आहे. तर पुतळा ज्यावर उभा असेल तो ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे. पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

मंत्री नितेश राणे यांनीही पुतळा उभारणी कामाचा आढावा दोन दिवसांपूर्वी सविस्तरपणे घेतला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा यां दृष्टीने मंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. एकूणच पुतळा उभारणी कामावर मंत्री नितेश राणे यांचे विशेष लक्ष आहे.

