१५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर घडली घटना
मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर मारहाण केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान अन्य चार संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये वैभव बाळकृष्ण मयेकर (३३, धुरीवाडा-मालवण), छगन नितीन सावजी (२०, वायरी भूतनाच), प्रथमेश रवींद्र शिरपुटे (२६, सोमवारपेठ मालवण) या तिघांचा समावेश आहे.
कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर सोमवारी मध्यरात्री जेवण दिले नाही, या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या मालक व कामगारांच्या डोक्यावर बाटल्या मारून गंभीर मारहाण केली होती. तसेच दागिन्यांची चोरी करीत साहित्याची तोडफोड केली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३११, ११८ (२), १८९ (४), १९१ (२), १९०, ३५१ (३), ३५२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक हत्याराने दुखापत, बेकायदेशीर जमाव, दंगा करणे, गर्दी जमविणे, शिवीगाळ, धमकी, मारहाण, नुकसान करणे अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. याबाबतची तक्रार खालसा ढाब्याचे बलजिंदर निर्मल सिंह (मूळ रा. विजयनगर गंगानगर, राजस्थान सध्या रा. कुंभारमाठ गोवेकरवाडी ता. मालवण) यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांनी तातडीने मालवण पोलीस ठाण्याला भेट देत आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे करीत आहेत.
या प्रकरणी पोलिसांकडून ठसेतज्ज्ञांना प्राचारण केले होते. ठसेतज्ज्ञांनी हॉटेलची पाहणी करीत घटनास्थळी मिळालेले ठसे घेतले होते.

