निलेश जोशी | कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी 'ऍड ऑन कोर्स इन प्रॅक्टिकल अकाउंटिंग अँड टॅक्सेशन' हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा कोर्स आठ दिवसांचा असून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी लागणारी विविध कौशल्य यामध्ये शिकविली जाणार आहेत.
यामध्ये अकाउंटिंग मधील मूलभूत संकल्पना तसेच त्याचा व्यवहारामधील वापर यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. यात मार्गदर्शन करण्यासाठी कुडाळ मधील प्रथितयश लेखापरीक्षक श्रीमती जयंती कुलकर्णी, लेखापरीक्षक अनिता काळे, तसेच एडवोकेट व कर सल्लागार मिलिंद गुप्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहून अकाउंटिंगचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करावीत. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून स्वतःला घडवावे. यावेळी तज्ञ मार्गदर्शक श्रीमती कुलकर्णी मॅडम, काळे मॅडम व ऍड . मिलिंद गुप्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. प्रकाश मसुरकर यांनी तर ऋणनिर्देश कु. जान्हवी गवंडे, हिने केले. या कार्यक्रमास डॉ. भास्कर, डॉ. जमदाडे व प्राध्यापक वर्ग, तसेच वाणिज्य विषयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

