कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची घेतली भेट
मालवण | प्रतिनिधी : शैक्षणिक दृष्ट्या पात्र नसलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याबाबत वरिष्ठ अधिकारी स्तरावरून आदेश आले आहेत. गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मालवण उपविभागातील अनेक कामगारांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यां प्रशनी कामगारांनी रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली.
दरम्यान, दत्ता सामंत यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेताना याप्रश्नी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून शासन स्तरावर काही तोडगा निघू शकतो का, यासाठी प्रयत्नाशील असल्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी वीज कर्मचारी प्रमोद अनंत परब, प्रकाश गोविंद परब, गौरव सत्यवान चव्हाण, श्रीपाद सत्यवान चेंदवणकर, अविनाश रामचंद्र आंबेरकर, अक्षय सत्यवान चव्हाण, आशिर्वाद मंगेश लुडबे, संदेश बाळकृष्ण मेस्त्री, तुकाराम मारुती चिंदरकर, सागर विष्णु गावठे व अन्य उपस्थित होते.
शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार जबाबदारीच्या आणि जोखमीच्या पदावर आम्ही तुम्हाला कार्यरत ठेवू शकत नाही. मागील 3 वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा महावितरण मध्ये सर्वात जास्त प्राणांकित अपघात झालेले आहेत ते टाळण्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या पात्र कर्मचारी कार्यरत ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेवून त्याबाबतचा पुरावा आमच्या एजन्सीस सादर करण्याची संधी आपणास देण्यात आली आहे. आणि त्याबाबत आपणास वारंवार सांगण्यात देखील आले आहे. त्या अनुषंगाने आपण 28 फेब्रुवारी 2025 अखेर योग्य शैक्षणिक कागदपत्रे अथवा प्रवेशाचा पुरावा सादर केल्यास आपणास सेवेमध्ये सामावून घेण्यात येईल, असे पत्र संबंधित एजन्सी कडून कामगारांना देण्यात आले आहे. या प्रश्नी कामगारांनी दत्ता सामंत यांची भेट घेतली आहे.
फोटो : कंत्राटी वीज कामगारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली. (अमित खोत, मालवण)

शैक्षणिक दृष्ट्या पात्र नसलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश
