धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग मार्गांवरील रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी
मालवण : शहरातील धुरीवाडा येथील झाटये काजू फॅक्टरी, श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग समोरील समुद्र किनाऱ्याजवळील रस्ता पूर्णतः खराब अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिकांना त्रास होत असून त्यांना दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहेत. तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या निधीतून या रस्त्याचे टेंडर निघाले असताना देखील अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. येत्या १० एप्रिल श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा येथे जत्रोत्सव असून, मोठ्या लोकसंख्येने भाविक या उत्सवास येतात, त्यामुळे तातडीने या रस्त्याचे काम सुरु करावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.
या कामासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर आदींनी पाठपुरावा केला होता. या शिष्टमंडळात यतीन खोत, भाई कासवकर, शहर प्रमुख बाबी जोगी, साई वाघ, पकी केरकर, पुंडलीक खोरजे, गणपत आडीवडेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याधिकारी यांनी साकारत्मक प्रतिसाद दिला असे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले.

