आनंदाश्रम व सविता आश्रम पणदूरला दिली वस्तू व रोख स्वरूपात मदत
मालवण | प्रतिनिधी : श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट पेंडूर, मालवण यांच्या वतीने आनंदाश्रम व सविता आश्रम पणदूर येथे सामाजिक बांधिलकी जोपासत आश्रमाला वस्तू रुपात व रोख रक्कम स्वरूपात मदत सुपूर्द करण्यात आली.
नुकताच मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील प्रसिद्ध असा 14 दिवस चालणारा देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव संपन्न झाला. या उत्सवामध्ये देवस्थान ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्यात प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर याबरोबरच ट्रस्टकडे 14 दिवसात जमा होणाऱ्या देणगी पैकी काही भाग तसेच वस्तू रूपातील मदत सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अनाथाश्रमास देण्याचा ट्रस्टचा मानस होता. त्या दृष्टीने 14 दिवस मांड उत्सवात याबाबत व्यापक प्रसिद्धीही देण्यात आली होती. मांड उत्सव संपल्यावर वस्तू रूपातील नारळ व तांदूळ तसेच देणगी पैकी काही भाग आर्थिक मदत अशाप्रकारे ट्रस्टने दोन आश्रमांना भेट देऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सरचिटणीस श्री अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत, रामचंद्र सावंत, संदीप सावंत आदी उपस्थित होते. श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्टचा हा सामाजिक भान जपणारा उपक्रम निश्चितच स्तुत्य व आदर्शवत असाच आहे.
फोटो : श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट पेंडूर यांच्या वतीने आनंदाश्रम व सविता आश्रम पणदूर येथे मदत सुपूर्द करण्यात आली. (अमित खोत, मालवण)

श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट पेंडूरची 'आदर्शवत' सामाजिक बांधिलकी
