मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका
पोलिस माफियांसोबत फिरत असल्याचा आरोप
निलेश जोशी | कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्यासाठी दिलेला आदेश प्रशासन गंभीरतेने घेताना दिसत नसल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्रशासनास दिलेल्या आदेशाचे स्वतः अवलोकन करण्याची गरज असल्याचा सल्ला श्री. किनळेकर यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, गेल्या चार-पाच दिवसापूर्वी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. सदर बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात सुरू असलेले अवैध दारूचे अड्डे आणि दारू विक्री, मटका-जुगार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कठोर कारवाई करणे तसेच हा जिल्हा ड्रग्स मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणे आपली ताकद वापरावी असे आदेश दिले होते.
परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनास कडक स्वरूपात आदेश देऊनही चार दिवस उलटले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. किंबहुना पोलीस प्रशासनाने पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला गंभीरतेने घेतलेले ही दिसत नाही. त्या उलट पोलीस प्रशासन असे अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशीही घालताना दिसत आहेत. काही पोलीस कर्मचारी तर असे अवैद्य धंदे करणाऱ्या माफीयांसोबत आपली ड्युटी संपल्यानंतर राजरोस मोटरसायकल वरून फिरतानाही दिसत आहेत. व अशा अवैध धंदे करणाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर तोडगा निघेस्तोवर बचावात्मक भूमिका घेण्याचे आव्हान देखील करत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

