दिपिका देऊलकर | हडी : मालवण तालुक्यातील हडी येथील नागेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १० डिसेंबर रोजी श्री देव नागेश्वर मंदिर, हडी येथे संपन्न होणार आहे.
१० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री देव नागेश्वर व श्री वालकाई देवी आणि श्री देव नागेश्वर मंदिर संकुलातील सर्व देवतांना मंगलस्नान व सुवासिक फुलांनी विधिवत पूजा-अर्चना करून उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर आदिशक्ती श्री वालकाई देवीची मानाची ओटी भरण्यास व नवसाची पूर्तता करण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी सुस्वर भक्तिमय भजने व त्यांनंतर दीपनृत्य होणार आहे.

जत्रोत्सवानिमित्त श्री देव नागेश्वर मंदिर संकुलामध्ये नेत्रदीपक दीपोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. रात्री दहाला गावराठी व आदिशक्ती श्री वालकाई देवी पालखी प्रदक्षिणा मिरवणुकीस प्रारंभ होईल व त्यानंतर रात्री १ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळाचा पारंपारिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
११ डिसेंबर रोजी सकाळी सूर्योदयावेळी दशावतारी श्रीकृष्णाचे रूप धारण करून दहिहंडी फोडल्यानंतर व महाआरती करून दहिकाला उत्सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव नागेश्वर हितवर्धक मंडळ (देऊळवाडी) हडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

