असरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अजित सावंत यांचा पुढाकार
जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयामध्ये आयोजन
असरोंडी : असरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अजित सावंत हे मागील दहा वर्षापासून आपल्या जन्म गावी आरोग्य शिबिर आयोजित करतात. अजित सावंत यांनी यंदा अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून यूरोलॉजी अर्थात मूत्रपिंड, मूत्राशय व तत्सम अवयवांच्या संबंधित आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनासोबत समन्वय साधत केले आहे.
डॉ.अजित सावंत हे मुंबईमधील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटल येथील युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख असून या शिबिरात त्यांच्यासोबत मुंबई यूरोलॉजिकल सोसायटीचे अन्य शैल्यचिकित्सक सुद्धा सहभाग घेणार आहेत.
पहिल्या टप्प्यात म्हणजेच 20 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार असून त्यात गरजवंत रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढच्या टप्प्यात शासकीय महाविद्यालयातच व गरज भासल्यास सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. आयोजक डॉ. अजित सावंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी व या उपक्रमाचे समन्वयक डॉक्टर अमेय देसाई यांनी या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती केली आहे.

