श्री देव रामेश्वराचा कौल झाला
15 डिसेंबर पासून ऐतिहासिक आचरे गावची गावपळण ; गाव होणार निर्मनुष्य
आचरा : दर तीन ते पाच वर्षांनी होणारी संस्थान आचरेची गावपळण या वर्षी श्री देव रामेश्वरच्या हुकुमावरून 15 डिसेंबर पासून होत आहे. तीन दिवस तीन रात्री चालणाऱ्या या गणपळणीत संपूर्ण आचरेवासीय वेशीबाहेर राहणार असल्याने साडे सात हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव निर्मनुष्य होणार आहे.
प्रथा परंपरा जोपासत सुरु असलेली ही गावपळण प्रथा लक्षवेधी ठरते. गावपळण प्रथेत सर्वधर्मीय आनंदाने सहभागी होत असतात. ग्रामस्थ आपल्या पाळीव प्राण्यांनाही गावाच्या वेशीबाहेर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या वस्ती ठिकाणी नेतात. संपुर्ण गाव खाली होतो. आचरे गावची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
डिसेंबर 2019 साली आचरे गावच्या गावपळननंतर यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रामेश्वराला देव दीपावली दिवशी दुपारी कौल प्रसाद घेण्यात आला. श्री रामेश्वराच्या हुकुमावरून प्रथेप्रमाणे 15 डिसेंबरला संस्थानकालीन आचरेची गावपळण होणार आहे. आचरेवासीय गावाच्या सीमेबाहेर कारीवणे नदी किनारी, चिंदर, त्रिंबक, पोयरे, मुणगे, आडबंदर, वायंगणी, सडेवाडी या भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून राहणार आहेत.
गावपळणीनिमित्त तीन दिवस तीन रात्री संपूर्ण आचरे गाव वेशी बाहेर एकत्र नांदणार आहे. आजच्या विज्ञान युगातही ही प्रथा ग्रामस्थ मोठ्या हैशीने पाळत आहेत. आनंदात हसत खेळत संगीत, भजने यात आचरे गावची रयत 3 दिवस तीन रात्री रममाण झाल्याचे दृश्य दिसणार आहे. ही प्रथा पाहण्यासाठी अनेक लोकही आचरे गावात दाखल होतात. गावपळण अनुभवतात.

