साने गुरुजी 125 कोकण यात्रेचे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत स्वागत
निलेश जोशी | कुडाळ : खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांची आज समाजाला गरज आहे. स्वतःवर प्रेम करता करता जगावर प्रेम करायला शिका. येथेच अखिल मानव जातीचे कल्याण सामावलेले आहे .असे उद्गार साने गुरुजी 125 कोकण यात्रेचे सदस्य डॉ.राजन गोपाळ यांनी काढले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर तालुका माणगाव आयोजित साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित साने गुरुजी 125 कोकण यात्रेचे आगमन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये झाल्यावर त्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखण्या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचे मुक्त कंठाने कौतुक केले.
साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त खरा तो एकची धर्म याचा संदेश गावागावात पोहोचविण्या साठी २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर तालुका माणगाव यांच्यातर्फे चवदार तळे महाड ते साने गुरुजी जन्मस्थान पालगड व्हाया बॅ.नाथ पै सेवांगण मालवण अशा साने गुरुजी 125 कोकण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . त्या निमित्ताने या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर 'साने गुरुजी 125 यात्रा' अभियानाचे समन्वयक राजन इंदुलकर, सिंधुदुर्गातील यात्रा संयोजक विद्या राणे, कोषाध्यक्ष माधुरी पाटील , विश्वस्त सिरत सातपुते ,प्रमोद जाधव ,विनायक धुरी, उमेश गाळवणकर, अरुण मर्गज, कल्पना भंडारी, चैताली बांदेकर, इत्यादी उपस्थित होते. सदर यात्रा कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये यात्रेमध्ये सहभागी झालेले वरील मान्यवर यांचे चेअरमन उमेश गळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ,विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. केले.
सदर यात्रेचे समन्वयक राजन इंदुलकर यांनी सुद्धा 'भरकटत झालेल्या देशाला वाचविण्यासाठी 'जगाला प्रेम अर्पावे आज खरा धर्म आहे' अशी धर्माची व्याख्या देणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांची आज गरज असल्याचे प्रतिपादन करत माणसाने तिरस्कार टाकून सहिष्णुता जोपासली पाहिजे. असे सांगत आपणा सर्वांमध्ये असलेल्या साने गुरुजींना आपल्या वागण्यातून पुनर्जीवत करण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले व या यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याबद्दल चेअरमन उमेश गाळवणकर व शिक्षण संस्थेचे आभार मानले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींची प्रसिद्ध प्रार्थना 'खरा तो एकची धर्म या प्रार्थनेच्या सुस्वर गायनाने सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यामार्फत करण्यात आली. त्याला मंदार जोशी यांचे संगीत मार्गदर्शन तर रजत गाळवणकर यांची तबला साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी परब यांनी केले. यावेळी शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

