अनेक प्रध्यापकांनी घेतला सहभाग
करियर कट्टा तर्फे आयोजन
निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रज्ञान विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसाठी नुकतेच एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव अशा आवाज कार्यशाळेला मुंबईच्या आवाज तज्ज्ञ श्रीम. सोनाली लोहार यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या करिअर कट्टाचे समन्वयक प्राध्यापक अजित कानशिडे यांनी प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे,प्रा.डॉ.ए. एन. लोखंडे आदींच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली.कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी भूषविले. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांची कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती व सहाय्य लाभले.
जवळजवळ बऱ्याच लोकांना तसेच अध्यापन करणाऱ्या अध्यापकांना 'आवाजाचे महत्त्व, त्याचे स्वास्थ्य आणि काळजी तसेच तो टिकवावा कसा' याविषयी अत्यल्प माहिती असते. बऱ्याच शिक्षकांना आवाजाच्या समस्या भेडसावत असतात. ही केवळ 'व्यावसायिक अडचण' आहे असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. या सर्व मुद्द्यांवर सर्वंकष प्रकाश टाकणारे एक ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशन हा या कार्यशाळेचा पहिला भाग ठरला. यात अनेक संकल्पना , गृहीतकं आणि आवाजाची काळजी कशी घ्यावी यावर साकल्याने आवाज तज्ज्ञ श्रीम. सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन केले.
मनुष्य शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे असते. ज्याला योग्य पद्धतीने वापरावे लागते व वेळेवर तेल पाणीही करावे लागते. आवाज निर्मितीसाठी लागणाऱ्या स्नायूंचीही अशीच निगराणी राखणे व त्यांची ताकद वाढवणे हे गरजेचे असते , नाहीतर हे यंत्रही भविष्यात आपल्याला त्रास देऊ शकते. या कडे लोहार यांनी लक्ष वेधले. कार्यशाळेत काही अत्यंत उपयुक्त असे आवाजाचे व्यायाम शिक्षकांना त्यांनी शिकवले. जे त्यांना रोजच्या व्यवहारात अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शेवटचे सत्र प्रश्न- उत्तरांनी संपले. पहिले सत्र ऑडिओ व्हिज्युअल दुसरे व्यायामाचे प्रकार आणि तिसरे सत्र प्रश्न उत्तर अशा एकूण तीन सत्रांमध्ये प्राध्यापकांनी सहभाग घेतला. करिअर कट्टाची विद्यार्थिनी साक्षी चव्हाण हिने कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक अजित कानशिडे यांनी मानले. महाविद्यालयाच्या करिअर कट्टाचे वासुदेव सावंत, सृष्टी गवळी , वेदिका लळीत आदी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, करिअर कट्टाचे विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते .

