देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर, वरचीवाडी येथील आंबा बागायदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन भावांनी आपल्या बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एम. बी मार्केटला रवाना केल्या आहेत.या हापूस आंब्याच्या एक डझनच्या एका पेटीला २ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी यांच्या आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासूनच मोहर येऊ लागला होता. या दोन बंधूंनी आपल्या बागेतील मोहर टिकावा या हेतूने नियोजन करून नियमित कीटनाशकांची फवारणी करून आपले पीक जपण्याचा प्रयत्न केला व यात त्यांना यशही आले. वातावरणात होणाऱ्या वारंवार बदलामुळे आंबा बागायतदारांना आंब्याचे चांगले पीक घेणे कठीण झाले आहे. अश्यावेळी नोव्हेंबर महिन्यातच देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे.

