मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे गणिततज्ज्ञ, ज्येष्ठ शिक्षक नितीन शंकर परुळेकर यांचा प्रशालेच्यावतीने ओझर विद्यामंदिरमध्ये शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला विद्यार्थ्यांमधून कु. संचिता परब आणि स्वरा कांबळी यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या आठवणी जाग्या केल्या. चालू वर्षीच्या दहावीच्या बॅचने सरांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव तसेच सहकारी शिक्षक अभय शेर्लेकर, शिवराम सावंत, सुनयना पवार यांनी आपल्या मनोगतातून परुळेकर सर यांना शुभेच्छा दिल्या. प्रवीण पारकर सर यांनी सरांसाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे कु. अस्मी पारकर हिने भावपूर्ण वाचन करताच तिच्यासह सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. याप्रसंगी ओझर विद्यामंदिरच्या २००८ सालच्या दहावीच्या बॅचच्यावतीने माजी विद्यार्थी गीतेश कोदे यांनी परुळेकर सर यांना शुभेच्छा पत्र प्रदान केले. सरांचे आवडते माजी विद्यार्थी अवधूत पारकर व वीरेश डिचलकर यांनीही सरांना पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीपर शुभेच्छा दिल्या.
नितीन शंकर परुळेकर सर यांनी ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यांचा गणित आणि विज्ञान विषयाचा एवढा गाढा अभ्यास होता, की त्यांना शिकवताना कधीही पुस्तक हातात घ्यावे लागले नाही. मितभाषी परुळेकर सर क्रिकेट बुद्धिबळ, गायन आणि सुंदर हस्ताक्षर कलेमध्येसुद्धा पारंगत होते. सेवानिवृत्त झालो तरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातूनच त्यांची अध्यापनाविषयीची तळमळ दिसून येते. परुळेकर सर यांनी शाळेच्या गोपाळकाला उत्सवासाठी लाकडी देव्हारा, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी तसेच शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. सरांच्या या दातृत्वाबद्दल प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी प्रशालेच्यावतीने त्यांचे आभार मानले.
नितीन परुळेकर सर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभाच्याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी तसेच गितेश कोदे,अवधूत पारकर आणि वीरेश डिचोलकर हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक पी.के. राणे सर यांनी मानले.

