अजित राणे यांनी उलगडला आपल्या यशाचा प्रवास
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये विशेष मुलाखत
निलेश जोशी | कुडाळ : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मेहनती शिवाय पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो असे प्रतिपादन उद्योजक अजित राणे यांनी केले. मराठी माध्यमातून पदवी संपादन करून खडतर प्रवास करून केनिया देशात आपल्या कार्यक्षेत्राच्या विशाखा पल्लवीत करणारे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक अजित राणे यांची विशेष मुलाखत नुकतीच पत्रकार आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी निलेश जोशी यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
अकराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सोसाव्या लागलेल्या यातना,आईचे संस्कार आणि इथल्या शिक्षणाचा आधार घेत मारलेली यशाची भरारी त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून दाखवली .
पत्रकार निलेश जोशी यांनी सर्वप्रथम त्यांचे स्वागत करून मुलाखतीला प्रारंभ केला. एका स्लीपरवर व पिशवीवर मुंबईचा प्रवास त्यांनी कथन केला तसेच मुंबईचे राहण्या पासूनचे सुरुवातीचे दिवस,मुंबईला जाईपर्यंत काहीच माहीत नव्हते.ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी नकारच मिळाला.गरीब चुलत काकांनी मुंबईला दिलेला आधार याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले .
प्रसिद्ध उद्योजक श्री.अजित राणे यांचे महाविद्यालयीन शिक्षण संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ,माध्यमिक शिक्षण कुडाळ हायस्कूल येथे तर संगिर्डेवाडी येथील प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.याप्रसंगी त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला ,तसेच बर्या च वर्षांनी महाविद्यालयांमध्ये आपण आलो आहोत इथले बदलते सकारात्मक चित्र , महाविद्यालयाची प्रगती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
इथल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नात कमी पडता कामा नये व घाबरता कामा नये. प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.आपण काही चोरी करीत नाही. लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जे लक्ष आपण गाठणार आहोत तीच स्वप्ने आपण पाहिली पाहिजेत आणि ती स्वप्न जागेपाणीही आपल्याला पडली पाहिजेत असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मूलमंत्र दिला.
केनियाला जाताना असणारी छोटीशी बॅग मी अजूनही जपून ठेवली आहे असे ते म्हणाले. माझा व्यवसाय मी वाढवत गेलो तो केनिया मधूनही करण्याचा प्रयत्न सुरूवातीला केला. परंतु व्यवसायाचा व्याप एवढा वाढला आहे की केनियात राहून यापुढे व्यवसाय करण्यापेक्षा भारतातच मुंबईला राहून व्यवसाय वाढवता येईल याकडे माझे लक्ष आहे असे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यश मिळवले पाहिजे त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही असे मुलाखतीत अजित राणे यांनी प्रतिपादन केले.इंग्रजी भाषेची भीती न बाळगता आपण तद्नंतर केलेले परिश्रम,लहान भावंडांचे शिक्षण ,वडील गेल्यानंतर आईचे मार्गदर्शन आदींबद्दल ते भरभरून बोलले.
येथील साधन संपत्ती,निसर्ग,पर्यटन आदींचाही त्यांनी मुलाखतून मागोवा घेतला. परकीय चलन इथे येण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.केनियामधील वातावरण, तिथली भाषा,संस्कृती व पर्यटनासाठी पोषक सुखसुविधांची त्यांनी उदाहरणे दिलीत. आपल्या जीवनात बदल घडवायचा असल्यास कठीण परिश्रमाला पर्याय नाही यावर त्यांनी भर दिला. आपण या महाविद्यालयामध्ये शिकलोय त्या महाविद्यालयाला आपले वेळोवेळी योगदान मिळेल याची त्यांनी खात्री दिली.अन्व्होकेत
मुंबईला विविध ठिकाणी केलेल्या नोकरी मधून मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर श्री.अजित राणे यांनी केनिया देशात जाऊन आपले भवितव्य उज्ज्वल केले.महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या मुलाखतीचे शीर्षकच के टू के असे होते अर्थात श्री.अजित राणे यांचा कुडाळ ते केनिया प्रवास. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे भूषविले. अजित राणे यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती तातेभाऊ राणे, पत्नी, क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट , क.म.शि.प्र.मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस, क.म.शि.प्र.मंडळाचे भाईसाहेब तळेकर, डॉ.संजय केसरे , माजी मुख्याध्यापक अनंत जामसंडेकर, प्रा.डॉ.ए.एन.लोखंडे, दिनेश आजगावकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अॅड.निलांगी रांगणेकर,अॅड.अमित सामंत ,सौ.नंदिनी देसाई, नंदू म्हापसेकर, सी.ए. सौ. जयंती कुलकर्णी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रा.ए.ए.मर्गज, नरेंद्र चव्हाण ,महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

