कुडाळच्या एसआरएम कॉलेजमध्ये आयोजन
मुलाखतीसोबतच 'भरारी' चे होणार प्रकाशन
निलेश जोशी | कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे माजी विद्यार्थी, प्रसिद्ध उद्योजक अजित राणे यांच्या कुडाळ ते केनिया अर्थात 'के टू के' प्रवासाबाबत विशेष मुलाखत व 'भरारी' वार्षिकांक प्रकाशन कार्यक्रम उद्या शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
कमशिप्र प्रमंडळाचे उपाध्यक्ष का आ सामंत, उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाहक आनंद वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिकांक 'भरारी'चे प्रकाशन श्रीमती सत्यवती तातेभाऊ राणे यांच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट बोर्डचे उद्घाटन डॉक्टर जी टी राणे यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाचे उपाध्यक्ष का आ सामंत यांच्या हस्ते उद्योजक अजित राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उद्योजक अजित राणे यांची विशेष मुलाखत संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी घेणार आहेत. या प्रकाशन व उद्घाटन सोहळ्यास तसेच मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी केले आहे.

