भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास
प्रचारात गावागावातून निलेश राणे यांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदार संघात गतिमान विकास साध्य करण्यासाठी जनतेने ठरवले निलेश राणे आमदार
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदार संघ मागील दहा वर्षात भकास करण्याचे काम विद्यमान आमदाराने केले आहे. नजिकच्या कणकवली आणि सावंतवाडी मतदार संघात कोट्यावधींचा निधी येत असताना दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे सत्ताधारी आमदार असलेल्या वैभव नाईकना मतदार संघात निधी आणणे शक्य झाले नाही. 2014 पूर्वी नारायण राणे यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या यां मतदार संघात दहा वर्षे विकास ठप्प आहे. जनताच कंटाळली आहे. जनतेला विकासाचे व्हिजन अपेक्षित असून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावागावातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनता मतदार संघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना बहुमताने विजयी करेल, असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांनी सोमवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होण्यापूर्वी व्यक्त केला आहे.
1990 पासून मालवण तालुक्याचे नेतृत्व नारायण राणे करीत आहेत. 2009 पासून कुडाळ मालवण मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर या दोन तालुक्यांना नारायण राणे यांचे नेतृत्व मिळाले. त्यामुळे हा मतदार संघ राज्यात नावारूपाला आला. राणे साहेबांचा मतदार संघ असल्याने त्यांचा दरारा राहिला. मात्र 2014 मध्ये राणे साहेबांचा येथून पराभव झाल्याने या मतदार संघाला उतरती कळा आली. वैभव नाईक आमदार म्हणून सपशेल अपयशी ठरले. साडेसात वर्षांच्या सत्ता काळात वैभव नाईक यांना मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक निधी देखील आणता आला नाही, त्यामुळे येथील मतदारांनी कां संधी द्यायची ? असा सवाल उपस्थित झाला आहे. मागील दहा वर्षात वैभव नाईक यांची संपत्ती वाढली. पण मतदार संघ भकास झाला. विधान भवनातला सिक्युरिटी गार्ड देखील त्याना आत सोडताना ओळखत नाहीत हे त्यांना एका अधिवेशन अडवलेल्या व्हिडीओतून स्पष्ट होते. आमदारकीच्या दहा वर्षात केवळ मंत्र्यांना भेटून निवेदनाचे फोटो काढणे या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही काम केले नाही. आज कुडाळ मालवण मतदार संघ विकासापासून दूर गेला आहे. दाखवण्यासारखे एकही विकासकाम आज वैभव नाईक यांच्याकडे नाही. त्यांची कुवत नसल्याने राज्यमंत्री पदही त्याना त्यांच्या पक्षाचा असताना मिळाले नाही ही यांची पात्रता ते जनतेला न्याय काय देणार. विकास काय करणार.
त्या उलट मागील चार वर्षे माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघात कार्यरत आहेत. जनतेची सेवा करत आहेत. विकासनिधी खेचून आणत आहेत. निलेश राणे यांनी मनात आणले असते तर राज्यसभा अथवा विधान परिषदेवरून खासदार किंवा आमदार बनण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र कुडाळ मालवण मतदारसंघ हा राणे साहेबांचा मतदार संघ अशी ओळखप्राप्त आहे. यां ठिकाणी गतिमान विकास झालाच पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यां भावानेतून त्यांनी काम केले, करत आहेत. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात सुमारे साडेसहाशे कोटींचा निधी निलेश राणे यांनी आणून दाखवला. सत्तेचे कोणतेही पद नसताना या माणसाने आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रत्येक गावागावात विकासनिधी नेण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश राणे आमदार झाल्या नंतर निश्चितपणे कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यातील पहिल्या पाच मतदारसंघात आणतील यामध्ये शंका नाही.
महायुतीचे उमेदवार म्हूणन त्यांना गावागावातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन विकासाच्या दृष्टीने विरोधक भाजपा, शिवसेना महायुतीत दाखल होत आहेत. या मतदार संघाला पुढे देण्यासाठी निलेश राणे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आता जनतेलाही समजली असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदार शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून निलेश राणे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील. हा विजय लक्षवेधी असेल. असा ठाम विश्वास अशोक सावंत यांनी व्यक्त केला आहे.

