निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ - मालवण मतदार संघात आमदार म्हणून गेल्या दहा वर्षांत जनतेला अपेक्षित असे काम केले आहे. मला उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचाराच्या सांगते पर्यंत जनता, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मी दहा वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. विरोधी उमेदवाराने काय काम केले?. दोघांच्याही कामाची तुलना जनता करेल आणि निश्चितच जनता मला भरभरून आशिर्वाद देईल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आ.वैभव नाईक यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
कुडाळ येतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत आ.नाईक बोलत होते. आ.नाईक म्हणाले, विधानसभा निवडणुक प्रचाराची सांगता होत आहे. माझा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचाराच्या सांगते पर्यंत मतदार संघातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे. माझा उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने लोक आले होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा असो, उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा असो किंवा कालची माणगाव येथील शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा असो, आमच्या या सर्वच सभांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी साठी जे मी गेल्या दहा वर्षांत काम केले आहे, तो जनतेचा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराला होता आणि हा जनतेचा मला मिळणारा प्रतिसाद निश्चितच या निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल. मी दहा वर्षात केलेले काम लोकांसमोर घेऊन गेलोय. त्याचबरोबर आता महाविकास आघाडीचे सरकार राज्य देणार आहे आणि त्यामध्ये पुढील पाच वर्षांत मी काय काम करू शकतो, हे जनतेला ज्ञात आहे. राज्यात लोकसभेप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीची सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे. त्यामुळे मी जनतेला एकच विनंती करेन की, मी केलेल्या कामाचा लेखाजोगा तुमच्यासमोर आहे. दोन वेळा आमदार केलात आता पुन्हा एकदा साथ द्या, तुमचे ऋण कामातून फेडेन, असे आ.नाईक यांनी आवाहन केले.
आ.नाईक म्हणाले, मी दहा वर्षात केलेली विकासकामे घेऊन जनतेसमोर गेलो आहे. मात्र विरोधी उमेदवार गप्प होते. ते प्रचारात काहीही बोललेच नाहीत. स्वतःच्या बोलण्यावर त्यांचा ताबा नसल्याने तसेच ते काही बोलले तर वाद निर्माण होतात, असे त्यांच्या सल्लागार, वडीलांनी सांगितल्यामुळेच ते काही बोलले नाहीत. त्यामुळे असा उमेदवार लोकांसमोर पाच वर्षात कसा काय टिकणार? हे लोकांनी आधीच ओळखलेल आहे. त्यामुळेच स्वतःच्या बोलण्यावर ताबा नसलेल्या उमेदवाराला जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल. तसेच राणेंच्या घराणेशाहीलाही येथील जनता जागा दाखवेल. नारायण राणे हे स्वतःच्या दोन्ही मुलांना प्रमोट करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. याआधी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली आश्वासने ते विसरले आहेत. लोकसभेत स्वतःचा प्रचार करून घेतला आणि आता मुलाचा प्रचार करायला लावला, त्यामुळेच त्यांचे कार्यकर्तेही नाराज झालेले आहेत. निश्चितपणे आमदार म्हणून मी दहा वर्षात विकास कामे केली म्हणूनच आज खा.राणे दारोदारी फिरत आहेत. तसेच मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांनी सुद्धा या कोकणासाठी काही केलेलेल नाही, म्हणूनच त्यांच्या सभेला लोक उठायला लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुडाळ येथे आले तेव्हा लोक उठायला लागले. त्यामुळेच त्यांची परत सभा घेण्याची हिम्मत झाली नाही. गेल्या महिन्याभरामध्ये एकही जाहीर सभा या मतदारसंघामध्ये ते घेऊ शकले नाहीत आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. येथील जनतेने मला दोनदा आमदार केलेला आहे. जिल्ह्यातील घराणेशाही हुकूमशाही आपल्याला या निवडणुकीमध्ये गाढायची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास या कुडाळ-मालवण दोन्ही तालुक्याचा आपल्याला करायचा आहे, असे आ.नाईक म्हणाले.
मतदार संघात आमच्या जाहीर सभा झाल्या, आणि विरोधक एकही मोठी सभा घेऊ शकलेले नाहीत. त्यांचे फक्त मेळावे झाले. आमच्या जाहीर सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माणगाव खोरेच काय, हा कुडाळ व मालवण तालुके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बालेकिल्ले असून, यापुढेही आमचेच बालेकिल्ले राहतील, असे आ.नाईक यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात मी आमदार म्हणून या मतदारसंघातील जनतेचे सर्वाधिक प्रश्न मी विधानसभेत मांडले. त्याचे रेकॉर्ड विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आहे, विधिमंडळानेही आकडेवारी जाहीर केली आहे. लोकांनी टिव्हीवर बघितले आहे. मात्र निलेश राणे यांनी खासदार असताना संसदेत मांडलेला पाच वर्षातील एकतरी प्रश्न त्यांनी दाखवावा, असे आव्हान श्री.नाईक यांनी दिले. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याची ज्यांनी भाषा केली होती, त्यांच्याबद्दल अपशब्द काढले होते, याचा कोकणातील जनता या निवडणुकीत निश्चितच हिशोब चुकता करेल असेही आ.नाईक यांनी सांगून राणेंवर टिकास्र सोडले.
निवडणूकीत कोण पैशांचे वाटप करतं हे लोकसभा निवडणुकीत येथील जनतेने पाहीले आहे. आम्ही कधी पैसे वाटप केलेले नाहीत. विरोधकांकडूनच पैशाचा वापर केला जातो. तरीही राणे जर आपण पेट्रोलिंग करणार असे म्हणत असतील तर आम्हीही त्यांच्या सोबत पेट्रोलिंग करण्यासाठी येण्यास तयार आहोत, असे उत्तर आ.नाईक यांनी खा.राणे यांच्या आरोपांना दिले.

माझा विजय निश्चित -आम. वैभव नाईक
