जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळेल
खोटले येथील गावभेट दौऱ्यात खा. राणे यांचा ग्रामस्थांशी संवाद
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता हे माझे कुटुंब मानतो. जिल्हा अधिकाधिक समृद्ध करायचा आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता गरजेची आहे. गतिमान विकास महायुती सरकारच करू शकते. त्यामुळे जनता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहील. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य जनतेच्या आशीर्वादाने मिळेल. असा विश्वास माजी केंद्रीय खा. नारायण राणे यांनी खोटले येथे बोलताना व्यक्त केला.
खोटले गावभेट दौऱ्यात खा. नारायण राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्ह्यात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. दोडामार्गात ५०० कारखाने आणण्याचा प्रयत्न असून यातून जिल्ह्यातील एक लाख नोकऱ्या उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न आहेत. तसेच पर्यटनातून अधिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न आहे. आपला जिल्हा आर्थिक समृद्धी येईल, असेही खा. राणे म्हणाले.
मालवण तालुक्यातील खोटले गावात श्री देव रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी निलेश राणे यांना मोठे विजयी मताधिक्य मिळावे यासाठी साकडे घालण्यात आले. यानंतर खा. राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जयवंत परब, गणेश घाडीगावकर, अमित ठाकुर, प्रभाकर परब, निळकंठ वंजारी, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, माजी सरपंच आनंद सावंत, रणजित परब, महादेव परब, विशाल सावंत, काशीराम परब, ज्ञानेश्वर परब, चंद्रकांत परब, उमेश पुजारे, विजय सकपाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, येथील ग्रामस्थांचा माझ्यावर हक्क आहे. अनेक नातेवाईक माझे परिसरातील गावात आहेत. एक आपुलकीचे नाते आहे. जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने मी आजवर राज्य व देश पातळीवर ११ पदे मिळाली. ही सर्व देखिल तुमच्यामुळेच मिळाली. त्यामुळे जनतेची जिल्ह्याची प्रगती व्हावी, यासाठी वेगवेगळे प्रकल्प येथे आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. या जिल्ह्याचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मी स्वखर्चाने मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल बांधले. कणकवलीत इंजिनिअरिंग कॉलेज बांधले. मी तुमच्या घरातला माणूस आहे. तुमच्यासाठी साहेब होणार नाही. मी सेवक आहे मला जनतेची सेवा करायची आहे. आगामी निवडणुकीत एकजुटीने निलेश राणे यांना मतदान द्या. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनीही निलेश राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

