शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : एक नेता… एक उद्यमशील नेतृत्व… सोबतच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या विश्वासाची धुरा खांद्यावर घेऊन निवडणुक मैदानात उतरलेले युवा नेतृत्व अर्थात निलेश नारायण राणे हे होय. कामाचा प्रचंड झपाटा आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि नेमकी समस्या क्षणात समजून घेण्याची कुवत… आणि ती सोडवण्याची धमक. मागील दहा वर्षे विकासापासून वंचित असलेली जनता आणि कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र विकसित व्हावे यासाठी रात्रंदिवस झटण्याची तळमळ सोबतच विकास निधी आणण्याची क्षमता. प्रसंगी जनतेच्या हितासाठी आक्रमक अन बेधडक पद्धत.. विकासाची दृष्टी असे एक नव्हे तर अनेक पैलू असलेला कोकणी जनतेला सुदैवाने लाभलेला लखलखता हिरा म्हणजेच महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे हे होय.
निलेश राणे हे वरकरणी आक्रमक वाटणारे नेतृत्व चुकीच्या ठिकाणी जरूर भडकेल, तोंडावरच रागावेल, पण… स्वप्नातही कोणाचे वाईट चिंतणार नाही. कधीच नाही!
सत्ता हाती नसतानाही कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी एवढा निधी खेचून आणला की इथला नेमका विद्यमान आमदार कोण हेच लोक विसरले! निवडणुकीच्या दरम्यान भाजपाऐवजी शिवसेनेतून निवडणूक लढवण्याचे वरिष्ठ पातळीवर ठरले, तेव्हा त्याच ताकदीने, संयमाने आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या मैत्रीच्या घट्ट संबंधाने परिस्थिती हाताळली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा सारा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला. लोकही मोठ्या संख्येने आणि त्याहीपेक्षा मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे येतात, त्यांना भेटतात. गेल्या दहा वर्षात विकास ठप्प असल्याने ज्यांच्या साऱ्या आशा संपल्यात, त्यांच्या हक्काचं, विश्वासाचं स्थान बनले आहेत ते निलेश नारायण राणे!
या दिलदार व्यक्तीमत्वाने संघर्षातून विश्वासाचे नाते जनतेसोबत निर्माण केलंय! विरोधकांनी वर्षानुवर्षे त्यांच्याभोवती गैरसमज आणि बदनामीचे टाकलेले जाळे भेदून हा योद्धा ठाम उभा राहिलाय. जनतेला हा विश्वास निर्माण झालाय की विकासाची धमक यां नेतृत्वात आहे. लोकांमध्ये आपुलकी व मैत्रीचा आदर्श असे हे नेतृत्व आहे. आज मायबाप जनतेच्या आशीर्वादावर ते स्वतःची नव्हे, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या उज्वल विकासासाठीची लढाई लढतोय!
म्हणूनच.. का जिंकणार, कसा जिंकणार हे सगळे प्रश्न कधीच इतिहासजमा झालेत! उरली आहे उत्सुकता फक्त मताधिक्याची! २३ नोव्हेंबर - या इथले आकाश मोकळे होण्याच्या दिवसाची. मालवण कुडाळच्या नव्या विकासपर्वाची. अर्थात आमदार निलेश राणे यांच्या नव्या पर्वाची.
अश्या भावना शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

