लांब पल्याच्या एसटी बसेस भुईबावडा येथे थांबण्याची मागणी
वैभववाडी | प्रतिनिधी : भुईबावडा येथे लांब पल्याच्या एसटी बसेसना यांबा नसल्याने भुईबावडा ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी कोल्हापूर पणजी एसटी बस अर्धा तास रोखून धरली. अखेर चालक वाहक यांना भुईबावडा येथे एसटी बस थांबवा अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा भुईबावडा ग्रामस्थांनी दिला. तसेच याबाबत एसटी महामंडळाला भुईबावडा येथे एसटी बसेसला थांबा देण्याची मागणी करणार असल्याचे ग्रामस्थ्यांनी सांगितले.
करूळ घाट मार्गाचे काम सुरु असल्याने भुईबावडा घाटमार्गे एसटी बसेसची वाहतूक सुरु आहे. भुईबावडा दशक्रोशित जवळजवळ १८ गावे येतात. त्यामुळे आजुबाजूचे प्रवासी भुईबावडा येथे येतात. परंतु लांब पल्याच्या एस टी बसेस भुईबावडा येथे थांबा देत नाहीत. वैभववाडी ते गगनबावडा थांबा असल्याचे वाहक चालकांकडून सांगण्यात येते. पुढील थांब्याचे तिकिट काढुन देखील चालक वाहक एसटी थांबवत नाहीत.
एस टी चा उपक्रम हात दाखवा बस थांबा असतानाही शासनाच्या या उपकमाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. एसटी बस लांब पल्याची असो अथवा लोकल असो. प्रवाशांना ज्या स्टॉपवर उतरायचे आहे त्याठिकाणी एसटी बस थांबली पाहिजे. लांब पल्याच्या एसटी बसेसना थांबा नसेल तर एसटी महामंडळाने शासन निर्णय जाहिर करावा. अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थ्यांमधुन केली जात आहे. यावेळी भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे, तानाजी मोरे, मनोहर मोरे, विश्वास राणे, अरुण मोरे, रमाकांत मोरे, विजय शिंदे, अनंत मोरे, अशोक मोरे, जनार्दन मोरे, धकटु गुरव यांच्यासह ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

