निवडणूक जनतेने घेतलीय हातात : त्यामुळे माझा विजय निश्चित
वैभववाडी येथे महायुतीच्या प्रचार सभेत नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास
वैभववाडी | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरळे - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाला तब्बल 438 कोटी रुपये दिले आहेत. याच मार्गावरील करूळ घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बंद आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे, याची जाणीव मला आहे. परंतु या घाट मार्गाकडे माझे बारकाईने लक्ष आहे. काही महिन्यांतच हा घाट सुरु होईल. तसेच घाटमार्ग दर्जेदार स्थितीत आपल्याला दिसेल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेला आपण उत्तर देत बसणार नाही. या निवडणुकीत वैभववाडी तालुक्यातून 90 टक्के मतदान आपण मला द्याल. मागील काही दिवसात भाजपा पक्षात झालेले प्रवेश पाहता. या मतदारसंघात औषधाला ही उबाठा सेना शिल्लक राहणार नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
वैभववाडी येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ खासदार नारायण राणे, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी नितेश राणे बोलत होते. मागील दहा वर्षात आपण जबाबदारीने काम केले आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे. तसेच काम पुढे करेन असे अभिवचन नितेश राणे यांनी दिले. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संवाद साधला आहे. जनतेचे उर्वरित समस्या जाणून घेतले. जनतेचे आशीर्वाद घेतले. यापुढे देखील पाच वर्ष संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.
करुळ घाटाचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. विरोधक घाटावर बोलत आहेत. परंतु घाट सुरू करा म्हणणारे विरोधक अपघात झाल्यास याची नैतिक जबाबदारी घेणार आहेत का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. घाट लवकरच दर्जेदार स्थितीत सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू झाल्यावर वैभववाडीला समृद्धी येणार आहे. असे सांगितले.
टीका करणाऱ्या विरोधकांनी नेमकं काय केलं. ते सांगितले पाहिजे. माजी खासदाराने काय केले असा त्यांनी सवाल केला. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे महायुतीच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेचे मतदारसंघात सर्वात जास्त लाभार्थी आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघात चांगले वातावरण करूया. भविष्यात सर्व निवडणुकीत विरोधकांना भीती वाटली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

