राज्यात पुन्हा महायुती सरकारच ; कुडाळ मालवण मधून महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार
खासदार नारायण राणे यांनी ठाम विश्वास व्यक्त करत गोळवण येथे जनतेशी साधला संवाद
संजय माने | पोईप : गोळवण गाव मागील कित्येक वर्षांपासून आपल्या पाठीशी कायमच राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक मतदान गोळवण गावातून महायुती उमेदवार निलेश राणे यांना नक्की मिळेल. असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. आपण स्वतः तसेच निलेश राणे, नितेश राणे व महायुती माध्यमातून एक वर्षात संपूर्ण सिंधुदुर्गचा कायापलट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातून महाविकास आघाडीचे नामोनिशान कायमचे मिटवूया.
मागील दहा वर्षात माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडून येथील जनतेची कोणतीही विधायक विकास कामे न झाल्याने मतदारांनी राऊत यांना घरी बसवले. आता वैभव नाईकांचा नंबर आहे. वैभव नाईक यांच्याकडूनही मागील दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघाचा कोणताही विकास झाल्या नसल्याने या निवडणुकीत येथील मतदार विनायक राऊतांप्रमाणे आमदार वैभव नाईक यांना घरी बसवतील. असा विश्वास खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोळवण येथे व्यक्त केला.
सुकाळवाड-पोईप जि.प मतदार संघातील गोळवण येथे गुरुवारी खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खळा बैठकीचे आयोजन तथा महायुती उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार नारायण राणे यांनी गोळवण येथील श्री देव रवळनाथ मंदिरात जाऊन निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतं झालेल्या खळा बैठकीत नारायण राणे यांच्या समवेत डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप जिल्हा उपा.अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गावडे, किसन मांजरेकर, सरपंच सुभाष लाड, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, पूजा वेरलकर, माधुरी मसुरकर, संतोष गावकर, सोनाली पाटकर, ऋत्विक सामंत, उप सरपंच शरद मांजरेकर, संजय पाताडे, प्रकाश चिरमुले, वीरेश पवार, पूर्णानंद नाईक, आशिष हडकर व मालवण तालुक्यातील भाजपा शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले, मागील दहा वर्षात या निष्क्रिय आमदारांनी कुडाळ मालवण मतदार संघाची पूरती वाट लावून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मतदारसंघ क्रमांक तीन वर घालवला याला कारण आमदाराचा नसलेला राजकीय अभ्यास होय. केवळ आश्वासने देण्यापलीकडे सध्याचा आमदार कोणतीही विकास कामे करताना दिसत नाही. त्यामुळे येथील जनतेने आता विनायक राऊत आणि वैभव नाईक यांचे आश्वासनाचे दुकान बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असून त्याचे उत्तर 23 नोव्हेंबरला या आमदारांना मिळेल. आमदारांप्रमाणेच मागील 10 वर्षाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकास कामे केलेली नाहीत. मतदार संघ सोडाच परंतु त्यांचे स्वतःचे गाव तळगाव मध्येही मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही बूथ वर आपल्याला मताधिक्य मिळालेले आहे. या खासदारांनी आपल्या गावातील किमान पाच तरुणांना तरी आपल्या कार्यकालात रोजगार उपलब्ध करून दिला असल्यास सांगावे. गावातील रस्ते पूर्वीप्रमाणेच आहेत. गोळवण गाव मागील कित्येक वर्षांपासून आपल्या पाठीशी कायमच राहिला आहे यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक मतदान गोळवण येथून निलेश राणे यांना मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण स्वतः आमदार नितेश राणे व निलेश राणे निवडून आल्यास एक वर्षात संपूर्ण सिंधुदुर्गचा कायापलट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातून महाविकास आघाडीचे नामोनिशान कायमचे मिटवूया.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुका भाजपा अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब व इतरांनी आमदार वैभव नाईक यांच्या निष्क्रिय कामाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून आगामी निवडणुकीत निलेश राणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गोळवण ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा उबाठा शिवसेना कार्यकर्त्या सौ. रुचिका चव्हाण त्यांचे पती राजेश चव्हाण यांनी खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी नारायण राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महायुती तर्फे चव्हाण दांपत्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धनंजय शेट्ये यांनी तर आभार गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

