'आनंददायी शनिवार’ उपक्रमातून सुगंधित उटणे निर्मिती व विक्रीचे प्रात्यक्षिक
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना; स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि व्यावसायिक कौशल्य विकासावर भर
मालवण | प्रतिनिधी : शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य, स्वावलंबन आणि उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तळगाव हितवर्धक संघ, मुंबई संचलित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगाव येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत सुगंधित उटणे निर्मिती व विक्रीचा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून व्यवसायाचे धडे गिरवले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक साहित्याचा वापर करून सुगंधित उटणे तयार करणे, त्याचे आकर्षक पॅकिंग व सजावट करणे, उत्पादनाचे बाजारमूल्य निश्चित करणे तसेच विक्री व्यवस्थापनाचे व्यावहारिक ज्ञान देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उटणे निर्मितीपासून ते विक्रीपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण खोचरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. सौ. दळवी व सौ. गोसावी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "अशा व्यावहारिक व व्यावसायिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि उद्योजकतेचे गुण विकसित होतात. शालेय जीवनातच व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्यास भविष्यात तळगावमधून उत्तम आणि प्रतिभावंत उद्योजक घडतील." यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ सुगंधित उटणे तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले नाही, तर उत्पादन निर्मिती, आकर्षक सादरीकरण, किंमत निश्चिती आणि विक्री यांसारख्या व्यवसायातील महत्त्वपूर्ण बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सांघिक कार्याची भावना, श्रमप्रतिष्ठा आणि स्वयंरोजगाराविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास चालना मिळाली. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणारा हा उपक्रम आनंददायी, ज्ञानवर्धक आणि कौशल्यविकासाला चालना देणारा ठरला.
▪️अमित खोत, मालवण

तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे!
