ज्योती रायशिरोडकर यांचा रिक्षा व्यावसायिकांकडून सत्कार
कुडाळ : खरंतर ट्रॅफिक पोलीस आणि वाहनचालक यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असते. ट्रॅफिक पोलिसांनी अडवले की वाहनचालकांच्या डोक्यावर आठ्याच पडतात. पण तोच ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी उन्हातान्हात कष्ट करत असतो. लोकांना वाहतुकीची शिस्त लावत असतो. कुडाळ मधील अशाच एका महिला ट्रॅफिक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांच्या कार्याची दखल पोस्ट ऑफिस नजीकच्या रिक्षा व्याबसायिकांनी घेऊन त्यांना महालक्ष्मीची प्रतिमा देऊन भाऊबीज केली. कुडाळ पोलिस ठाण्यात हा आगळावेगळा भाऊबीज कार्यक्रम झाला.
कुडाळ शहरांमध्ये वाहतूक कोंडी दररोज डोकेदुखी ठरत आहे. मात्र या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी कुडाळ पोस्ट ऑफिस नाका येथे महिला पोलीस वाहतूक नियंत्रक ज्योती रायशिरोडकर या मेहनत घेत असतात. त्यांच्या या मेहनतिची दखल घेऊन रिक्ष संघटनेच्यावतीने भाऊबीज निमित्त रिक्षाव्यवसायिकांनी त्यांचा कुडाळ पोलीस ठाण्यात सत्कार केला.
कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस ते एसटी बस स्थानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. पोस्ट ऑफिस येथे मालवणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नियंत्रित करणे कठीण काम असते आणि हे काम महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर या करत असतात. त्यांच्या या कर्तव्याला सलाम म्हणून पोस्ट ऑफिस येथे असलेल्या रिक्षा व्यवसायिकांनी त्यांचा सत्कार करून सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखन लव्हे, रिक्षा व्यावसायिक बाळू कुंभार, गणपत सावंत, नारायण घाटकर, चंदू वालावलकर आदी उपस्थित होते.

