आलेल्या शेती पिकाला कोंब फुटले ; शेतकरी चिंताग्रस्त
पोईप | संजय माने : गडगडाट व विजांच्या कडकटासह कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने मालवण परिसराला झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. परतीच्या पावसाचा फटका भात शेतीसह नाचणी भुईमूग पिकालाही बसत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मालवण तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने. बुधवारी सायंकाळी काहीठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर गुरुवारी रात्री अच्यानक जोरदार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाने भात शेती बरोबरच नाचणी व भुईमूग शेतीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. या पावसाने भात शेती कापणीत विलंब होत असून भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
गुरांच्या वैराणीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पावसाने नाचणी पीक कापणीला विलंब होत असल्यामुळे जंगली प्राण्याकडून भात शेती बरोबरच नाचणी शेतीचे नुकसान होत आहे. एकीकडे परतीचा पाऊस तर दुसरीकडे रान डुक्कर, गवा रेडा माकडा. सारख्या जंगली प्राण्याकडून उभ्या पिकाची नासधूस होत आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस व जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
परतीच्या पावसामुळे भात, नाचणी, भुईमूग काढण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. पीक नुकसानीची भीती आहे.

