बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या दिवाळी प्रदर्शनाचे औचित्य
प्रदर्शनाचे संगीतकार कुणाल भगत आणि अंकिताच्या हस्ते उदघाटन
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण हार्टेड गर्ल आणि कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस फेम अंकीता प्रभूवालावलकर आणि सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगत ह्यांचा बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. निमित्त आहे ते बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उदघाटनाचे. उद्या २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अंकिता प्रभूवालावलकर आणि कुणाल भगत यांचा सत्कार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कोकणातील हजारो कलाकारांना सिने मालिका क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देणारे दिग्दर्शक, फिल्म लाईन प्रोड्यूसर तथा कोकण कला केंद्र अध्यक्ष साईनाथ जळवी आणि निवेदक अमर प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच त्यांच्याशी गप्पा टप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्याच बरोबर बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्त आकाश कंदील मेणबत्ती अथवा विविध भेट कार्ड बनवलेल्या आहेत. या भेटवस्तूंचे प्रदर्शन मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता कुडाळ येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन मध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बिग बॉस फेम कोकण-महाराष्ट्र हार्टेड अंकिता वालावलकर आणि सिने संगीत दिग्दर्शक कुणाल भगत आणि साईनाथ जळवी हे करणार आहेत.
या सन्मान सोहळ्याला आणि प्रदर्शनाचा आणि यानिमित्ताने आयोजित केलेल्या गप्पाटप्पांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रिया केडगाळे यांनी केले आहे..

बिग बॉस फेम अंकीता प्रभुवालावलकर उद्या कुडाळमध्ये
