निहार नाना साईल | मालवण
भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच आज ऋषीपंचमी् दिवशी कलावती आईंची जयंती साजरी होत आहे.
वडील श्री. बाबुराव कल्याणपूरकर यांना दुर्गा देवीच्या मिळालेल्या दृष्टांतानंतर, गोकर्ण येथे जन्मलेल्या "रक्मा कल्याणपूरकर" यांचे हुबळी येथील सिद्धारुढ स्वामींनी दिलेले साधक म्हणजेच दीक्षा नाव "कलावती".
जन्मापासूनच दिव्य असणाऱ्या "बाळ" उर्फ "रक्मा" वयाच्या सातव्या वर्षी पूर्णानंद यतीराज यांच्या कडून प्रसाद/भेट स्वरूपात कृष्ण प्राप्त झाल्यानंतर कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. उठता बसता त्यांना कृष्ण हवे असत. झोपून उठल्यावर कृष्ण दर्शनच व्हावे असा बालहट्ट असणाऱ्या कलावती आईनी मोठेपणी समाजाच्या उन्नतीसाठी "परमार्थ निकेतन" ची स्थापना करून, मराठी, हिंदी, कानडी गुजराती भाषिक विविध समाजामध्ये गावोगावी हरी भक्ती चा प्रसार केला.
गिरिधर मी पुजणार आजी (आज), यदुविर मी पुजणार असे गात, भजन मार्ग हा भगवंतासोबत जोडले जाण्याचा म्हणजेच योग साधण्याचा, परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन होण्याचा योग्य मार्ग आहे. हे शास्त्र जाणून त्यांनी स्वतः देखील अनेक भजनांची रचना केली त्यांना सुंदर चाली देखील दिल्या.
"कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार" हे जाणून त्यांनी भगवंताच्या (हरी) नामस्मरणाचे महत्व सर्वांना पटवून दिले.
हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् ।
कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा॥
कलियुगात हरीचे नाव, हरीचे नाव, हरीचे नाव याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही नाही नाही. त्यामुळे त्यांनी बालपणापासूनच या भौतिक शरीरात बद्ध असणाऱ्या प्रत्येक आत्मस्वरूप व्यक्तीचा अतिशय वेगाने उद्धार व्हावा म्हणून बालोपासना, सतत हरी चिंतन होत राहावे म्हणून नित्योपासना तयार केल्या.
अंतिम सत्य जगाला समजावे म्हणून त्यांनी बोधामृत हा ग्रंथ लिहिला. हरिस्तुती हे त्यांचे विशेष आवडते भजन प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णप्रताप, कथासुमनहार असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले, यासाठी की आपल्याला (भक्तांना) कृष्ण कृपा मिळावी आणि आपल्या अनेक जन्मानंतर मिळणाऱ्या या मानवी जीवनाचा सदुपयोग करून, कृष्णभक्ती करून आपण या भौतिक संसारातून मुक्त होऊन (मृत्यूपश्चात) भगवतधाम प्राप्त करावे.
श्री गजानन महाराज (शेगाव), अक्कलकोट स्वामी महाराज(अक्कलकोट), परमपूज्य बाळू मामा(आदमापुर), श्री स्वरूपानंद स्वामी महाराज(पावस), श्री रामदास स्वामी(दासबोधकार सज्जनगड), गगनगिरी महाराज (गगनबावडा), श्री शंकर महाराज या सर्व महान गुरूंनी, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, अशा प्रकारे हरी नाम घेण्यास आपल्याला आज्ञा केली आहे. मात्र कलियुगाच्या प्रभावात ती आज्ञा विसरून भक्त मंडळी गुरुंच्याच नामाचा जप करून साधना केल्याचा आभास अनुभवत आहेत. आणि अजाणतेपणी, गुरू आज्ञा पालन न करण्याच्या पापाचे देखील भागीदार बनत आहेत.
या महान संतांनी, गुरूंनी आपल्याला आपल्या (गुरूंच्या) नावाचा जप करा असे सांगितलेले नाही. तर केवळ "हरिनाम" सांगितलेले आहे.
हरी हे भगवान श्रीकृष्णांचे नाव आहे.
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः। अनादिरादि गोविन्दः सर्वकारण कारणम्॥
ब्रह्मसंहितेत स्वतः या ब्रह्मंडाचे निर्माते ब्रह्माजी आपल्याला सांगतात की श्रीकृष्ण हेच परम ईश्वर आहेत. कायमचे (नित्य) आनंदी असे त्यांचे शरीर असून या समस्त विश्वातील सर्व कारणाचे ते मूळ कारण आहेत. म्हणजेच सर्व काही तेच आहेत.
अज्ञानवश आपण, श्रीकृष्णांना भगवान विष्णू यांचा फक्त आठवा अवतार समजतो मात्र भगवान विष्णू हे स्वत:च्या मूळ व नित्य अशा "श्रीकृष्ण" या स्वरूपात आठव्या स्थानी आल्याचे आपण योग्य भक्ती मार्गात आल्यानंतरच जाणू शकतो.
विष्णू हे एक तत्व आहे, भगवंत स्वयं श्रीकृष्ण आहेत. त्यासाठी आपण भगवदगीता जशी आहे तशी याचे सखोल आणि अभ्यासपूर्ण वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे अत्यावश्यक आहे.
हरी नामस्मरण हा एकमेव मार्ग आपल्याला उपलब्ध आहे. कलावती आई तसेच अन्य साधू संतांच्या कृपेने आपल्याला मार्ग दिसत असताना त्याचा स्वीकार न करणे हे त्या संतांचा आदर न करण्यासारखेच होईल.
तुमच्या जीवनात "हरिनामाला" अढळ स्थान प्राप्त होवो हीच भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना.
हा लेख "परमपूज्य कलावती आईना" अर्पण.
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे |
हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे ||

