स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी घेतली तात्काळ दखल
पालिका कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छ करून घेत नागरिकांना दिलासा
नियम मोडणाऱ्याना नोटीस बजावण्याबाबत प्रशासनास निर्देश
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील धुरीवाडा परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्येची दखल मालवण पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी घेतली आहे. प्रशासकीय ताफ्यासह घटनास्थळी भेट देत तातडीने कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छ करून घेत नागरिकांना दिलासा दिला.
सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पूनम चव्हाण यांनी जनहिताच्या कामांना अग्रक्रमाने स्थान दिले. धुरीवाडा येथे कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती होती. याची गांभीर्याने दखल घेत पुनम चव्हाण यांनी स्थानिक नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसराचा दौरा केला.
याठिकाणी सांडपाणी थेट उघड्या गटारांमध्ये सोडत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याची गंभीर दखल घेत सभापती चव्हाण यांनी नियम मोडणाऱ्याना तात्काळ नोटीस बजावण्यात याव्यात असे निर्देश स्वच्छता निरीक्षकांना निर्देश दिले.
शहरात घंटागाडीची सोय असतानाही रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून चव्हाण यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी प्रत्येक घरात जाऊन कचरा घेतला किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. या मोहिमेनंतरही जर कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळले, तर त्यांच्यावर पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
शहराची स्वच्छता ही केवळ पालिकेचीच जबाबदारी नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. कचरा घंटागाडीचा वापर करा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सभापती सौ. चव्हाण यांनी केले आहे. या धडक मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अमित खोत, मालवण

