कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व..!
अमित खोत | मालवण : मालवण नगर परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम सभापती पदावर नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निस्वार्थी भावनेतुन अखंडितपणे कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान नेतृत्वाचा हा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. बांधकाम सभापती म्हणून पदाला न्याय देताना सर्वसामान्य जनतेला अपेक्षित अशा समाजाभिमुख कार्याचा ठसा सहदेव बापर्डेकर निश्चितच उमटवतील असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
मालवण शहर मेढा राजकोट येथील रहिवासी सहदेव बापर्डेकर यांचे मूळ गांव देवगड तालुक्यातील हिंदळे-मोर्वे हे होय. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. मासेमारी व पर्यटन व्यवसायात त्यांनी यशस्वी झेप घेतली. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पाटलावर एक यशस्वी उद्योजक म्हणून सहदेव बापर्डेकर नावलौकिक प्राप्त केला आहे. सोबतच सामाजिक कार्यात त्यांचे बहुमोल असे योगदान नेहमीच राहिले.

राणे साहेबांचा कार्यकर्ता हा अभिमान अर्थात सर्वोच्च पद म्हणून बापर्डेकर नेहमीच जपतात. राणे साहेब 1990 साली मालवण मतदार संघातून पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी राणे साहेबांच्या सोबत जी कार्यकर्त्यांची फौज होती त्यापैकीच सहदेव बापर्डेकर हे एक होय. सहदेव बापर्डेकर यांच्या कार्याची पोचपावती म्हणून राणे साहेबांनी 1995, 96 च्या दरम्यान बापर्डेकर यांना शिवसेना मालवण शहर प्रमुख पदी बढती दिली. बापर्डेकर यांनी आपल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय दिला.

दरम्यानच्या काळात व्यवसाय उद्योग याकडे अधिक लक्ष दिल्याने राजकीय पटलापासून ते काहीसे दूर होते. मात्र राणे साहेबांच्या मार्गदर्शनात घडलेल्या हा कार्यकर्ता सामाजिक सेवेत अखंडित कार्यरत राहिला.
निलेश राणे मालवण कुडाळचे आमदार झाले. नितेश राणे राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. राणे साहेबांप्रमाणे या दोघांची कार्यशैली जिल्हा अनुभवत असताना सहदेव बापर्डेकर हेही आमदार निलेश राणे व मंत्री निलेश राणे यांची कार्यशैली पाहून पुन्हा राजकीय प्रवाहात प्रवाहित झाले. राणेसाहेबांचे आशीर्वाद व मार्गदर्शन सोबत घेऊन सहदेव बापार्डेकर यांची नवी राजकीय इनिंग सुरू झाली. त्याला निमित्त ठरले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत. काही महिन्यांपूर्वी मेढा राजकोट येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असताना दत्ता सामंत म्हणाले राणेसाहेबांच्या आशीर्वादाने सहदेव बापर्डेकर लवकरच मोठ्या पदावर असतील. त्यानंतर काही महिन्यातच नगरपालिका निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी सहदेव बापर्डेकर यांना नगरसेवक पदाचे तिकीट दिले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून राजकोट, मेढा, सुतारवाडा, कोतेवाडा, चिवला बीच या मालवण नगरपरिषद प्रभाग सहा मधील जनतेच्या मोठ्या पाठिंबावर सहदेव बापर्डेकर नगरसेवक म्हणून विजयी झाले.

सहदेव बापर्डेकर यांचा सुरू झालेला नगरसेवक पदाचा प्रवास आमदार निलेश राणे यांच्या भक्कम पाठबळावर मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापती पदावर पोहोचला आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सहदेव बापार्डेकर नेहमीच समाजकार्यात आपले योगदान देत आहेत. त्याच प्रमाणे बांधकाम सभापती म्हणून निश्चितच आपल्या सेवाभावी कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवतील यात शंका नाही.

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमचे आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जो विश्वास दाखवला त्याला पात्र राहून राणे साहेबांना अपेक्षित असे जनसेवेचे कार्य माझ्या हातून घडेल.
राजकोट, मेढा, सुतारवाडा, कोतेवाडा, चिवला बीच या प्रभाग सहा मधील मतदार व नागरिक यांनी नगरसेवक म्हणून मला विजयी केले त्यामुळेच आज मालवण शहराचा बांधकाम सभापती झालो आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सोबतीने संपूर्ण मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. असे सांगत सहदेव बापर्डेकर यांनी मालवण शहर वासियांचे आभार व्यक्त आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शना मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले लक्ष राहील. मालवण शहरातील जनतेला जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी तत्पर राहीन. राणे साहेबांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांना अपेक्षित असे कार्य करण्यासाठी सदैव जनसेवेत राहणार असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.
▪️ राजकोट मच्छिमार संस्था संस्थापक
राजकोट मच्छीमार संस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून सहदेव बापर्डेकर यांनी 15 वर्षे सेवा दिली. या कार्यकाळात संस्था सभासदांना अधिक सक्षम करण्याच्या हेतूने राणे साहेबांच्या माध्यमातून 15 एनसीडीसी बोट तसेच एक इन्सुलेटेड वाहनही उपलब्ध करून दिले. संस्था सभासद यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच राहिला.

