शिवसेना, भाजपा महायुतीचा दणदणीत विजयाने मालवण भगवेमय
जिल्हापरिषद, पंचायत समिती सर्व सदस्यांचा विजय नव्या विकासपर्वाची नांदी
अमित खोत | मालवण : राणे साहेब हाच पक्ष आणि राणे साहेब हेच नेतृत्व हे समीकरण मालवण तालुक्यात 1990 पासून आजही कायम आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुक निकालातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्याच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. मालवण तालुक्यात निलेश राणे यांच्या नेतृत्वा सोबत मालवणची जनता ठामपणे उभी राहिली. उबाठा व काँग्रेस उमेदवारांची धुळधाण उडाली. मालवणातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकत शिवसेना भाजपा महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. संपूर्ण मालवण भगवेमय झाले.
1990 साली आमदार म्हणून राणे साहेबांनी मालवणचे नेतृत्व करतं पालकत्व स्वीकारले. 35 वर्षे उलटली तरी राणे साहेब हाच विश्वास आणि नेतृत्व कार्यकर्ते अभिमानाने मिरवत आहेत. राणे साहेबांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांची फौज गावागावात असून महायुतीच्या विजयात राणे साहेबांच्या या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेची साथ महत्वपूर्ण ठरली आहे.
राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आहेत. पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. तर निलेश राणे यांच्या रूपाने हक्काचे आमदार मालवण कुडाळ मतदार संघाला मिळाले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाची छाप त्यांच्या कार्यातून प्रत्येक वेळी उमटली आहे. सर्व अधिवेशनात आमदार निलेश राणे यांचा आवाज जनतेचा आवाज बनून विधानसभेत घुमला. सोबतच शेकडो कोटी निधी विकास कामांच्या माध्यमातून मालवण कुडाळ ला मिळाला. विकासाची धमक 'राणे' नावात ठासून भरली आहे हे निलेश राणे यांच्या कार्यातून जनतेने पुन्हा अनुभवली. याचं विश्वासावर जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या बाजूने कौल दिला आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित केला.
आमदार निलेश राणे यांची कार्याशैली, अभ्यासू वृत्ती, खंबीरता आणि आपलेपणा प्रत्येकाला भावतो. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण त्यांचा चाहता होतो. मतदार संघाचा दौरा तसेच निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आमदार निलेश राणे गाव, वाडी वस्तीवर जातात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी असलेली गर्दी सर्वकाही सांगून जाते. हेच प्रेम मतदारांनी मतपेटीतून महायुतीच्या पारड्यात टाकले आणि महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. उबाठा व काँग्रेस च्या सर्व उमेदवारांचा झालेला पराभव म्हणजे आमदार निलेश राणे हेचं जनतेचे नेतृत्व आहेत. हाच संदेश या निवडणुक निकालातून जनतेने अधोरेखित केला.
शिवसेना महायुतीच्या 18 पैकी 18 जागा मालवणात विजयी झाल्या. यातील अनेक विजयी उमेदवार एक हजार ते दीड हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. महायुतीच्या उमेदवारांनी विजय घासून नव्हे तर ठासून मिळवला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात हाच झंझावात यापुढेही कायम राहणार आहे.

आ. निलेश राणे यांच्या झंझावाती नेतृत्वाच्या बाजूने जनतेचा कौल!
