आ. निलेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्याच्या बाजूने जनतेचा कौल
शिवसेना, भाजपा महायुतीचे सर्व उमेदवार विजयी
दारुण पराभवासह उबाठा व सर्व विरोधकांची धुळधाण
अमित खोत | मालवण : मालवणी जनता राणे साहेबांच्या सोबतच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्याच्या बाजूने जनतेने कौल दिला असून शिवसेना, भाजपा महायुतीचे सर्व उमेदवार जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाले आहेत. दारुण पराभवासह उबाठा व सर्व विरोधकांची धुळधाण उडाली. शिवसेना भाजपा महायुतीने 6 जिल्हापरिषद व पंचायत समिती 11 अश्या सर्व जागांवर दणदणीत मिळवला. आडवली मालडी पंचायत समिती जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने मालवण तालुक्यात 100 टक्के यश महायुतीला मिळाले.

महायुतीच्या विजयानंतर सर्व विजय उमेदवार व शिवसेना भाजप महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, मंदार लुडबे यांसह सर्वांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण झाली. राणे साहेबांचा विजय असो, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो, पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो, आमदार निलेश राणे यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश राणे यांनी विकासाचा झंझावात निर्माण केला. राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन जनतेने मोठा पाठिंबा महायुतीला दिला. महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजय निश्चित केला.

आडवली मालडी : सोनाली घाडीगावकर, दिपक चव्हाण विजयी
आडवली मालडी जिल्हापरिषद मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या सोनाली सुनील घाडीगांवकर यांनी उबाठा उमेदवाराचा 723 मताधिक्याने पराभव करतं विजय मिळवला. जिल्हापरिषद सदस्या म्हणून दुसऱ्या वेळी विजयी झाल्या. याठिकाणी पंचायत समितीतून सीमा परूळेकर (भाजप महायुतीच्या) यापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर शिरवंडे पस मतदारसंघातून शिवसेना महायुतीच्या दीपक (बंडू) चव्हाण यांनी उबाठा उमेदवाराचा 447 मतांनी पराभव करतं विजय नोंदवाला.

आचरा : वर्षा सांबारी, गणेश तोंडवळकर, दिपक सुर्वे विजयी
आचरा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीच्या वर्षा मंगिरीश सांबारी यांनी उबाठा उमेदवाराचा 166 मतांनी पराभव करतं विजय मिळवला. तर आचरा पंचायत समितीत शिवसेना महायुतीच्या गणेश तोंडवळकर यांनी उबाठा व अपक्ष उमेदवाराचा पराभव करतं 661 मताधिक्याने विजय मिळवला. चिंदर पंचायत समितीत भाजप महायुतीच्या दीपक सुर्वे यांनी उबाठा व काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. 31 मतांनी विजय मिळवला.

मसुरे मर्डे : क्षमा हडकर, योजना कांबळी, छोटू ठाकूर विजयी
मसुरे मर्डे मतदारसंघात भाजपा महायुतीच्या क्षमा संदीप हडकर यांनी उबाठा उमेदवाराचा 532 मतांनी पराभव करतं विजय मिळवला. पंचायत समितीमध्ये शिवसेना महायुतीचे माजी उपसभापती संजय उर्फ छोटू ठाकूर यांनी उबाठा उमेदवाराचा 323 मतांनी पराभव करत विजय मिळवला. तर कोळंब पंचायत समितीतुन भाजपा महायुतीच्या योजना कांबळी यांनीही उबाठा उमेदवाराचा 567 मतांनी पराभव करत विजय मिळवला.

सुकळवाड : सुमेधा पाताडे, प्रज्ञा चव्हाण, संतोष गावडे विजयी
सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून माजी जिप अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे या विजय झाल्या त्यांनी उबाठा उमेदवाराचा 1865 मताधिक्याने पराभव केला. पोईप पस मतदार संघात शिवसेना महायुतीच्या प्रज्ञा चव्हाण यांनी उबाठा व अपक्ष उमेदवारांचा पराभव करत 1549 मताधिक्याने विजय मिळवला. तसेच सुकळवाड पस मधून भाजपा महायुतीच्या संतोष गावडे यांनी उबाठा व अपक्ष उमेदवाराचा पराभव करत 172 मतांनी विजय मिळवला.
पेंडूर : संतोष साटविलकर, माधुरी मसुरकर, रिया बावकर विजयी
पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून माजी जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर विजयी झाले. त्यांनी उबाठा उमेदवाराचा 1441 मतांनी पराभव केला. तसेच वराड पंचायत समितीत भाजपा महायुतीच्या भाजपा महिला तालुकाध्यक्षा माधुरी मोहन मसुरकर यांनीही उबाठा उमेदवाराचा 411 मतांनी पराभव करत विजय मिळवला. पेंडूर पस मधून शिवसेना महायुतीच्या रिया बावकर विजयी ठरल्या. त्यानी उबाठा उमेदवाराचा 823 मतांनी पराभव केला.
वायरी भूतनाथ : अक्षता गावडे, मानसी भोगावकर, श्याम झाड विजयी
वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना भाजप महायुती पुरस्कृत अक्षता राजन गावडे या विजयी झाल्या. त्यांनी उबाठा उमेदवाराचा 1181 मतांनी पराभव केला. त्यांच्यासोबत कुंभारमाठ पंचायत समितीत शिवसेना महायुतीच्या मानसी प्रमोद भोगावकर विजयी झाल्या. त्यांनी उबाठा उमेदवाराचा 1488 मतांनी पराभव केला. वायरी भुतनाथ पंचायत समितीत भाजपा महायुतीचे शाम चंद्रकांत झाड हे 196 मतांनी विजयी ठरले. त्यांनी उबाठा व काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

….महायुतीच्या विजयाचा कळस निर्माण झाला : दत्ता सामंत
शिवसेना-भाजप महायुतीच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले राणे साहेबांनी 1990 पासून या मालवण कुडाळ मतदारसंघासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा पाया रोवला. आता राणे साहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आमदार निलेश आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या झंझावाती विकास कार्यातून महायुतीच्या विजयाचा कळस निर्माण झाला आहे. महायुतीच्या या दणदणीत विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आहे. मतदारांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून मालवण तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय राहील.
राणेसाहेबांनी ज्यावेळी महायुती जाहीर केले त्याचवेळी विजय निश्चित झाला होता. कारण हे जे विजय उमेदवार आहेत ते सर्व राणेसाहेबांचेच कार्यकर्ते आहेत. अनेक कार्यकर्ते राणेसाहेबांनीच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे जनतेने महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनात विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. आमचे सर्व विजय उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहतील. या विजयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग संपर्क मंत्री उदय सामंत यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. असेही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले.
विरोधकांचा धुव्वा उडवत महायुतीचा मोठा विजय : अशोक सावंत
आमचे नेते राणे साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात विरोधकांचा धुव्वा उडवत महायुतीने मोठा विजय मिळवला. मतदारांचे मनःपूर्वक आभार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सर्व विजय उमेदवार कार्यरत राहतील. असा विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

महायुतीचा महाविजय : धोंडी चिंदरकर
मालवण तालुक्यात भाजप शिवसेना महायुतीने सर्व जागा जिंकत महाविजय मिळवला आहे. कोकणचे भाग्यविधाते राणे साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे यश आहे. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार. महायुतीचे विजयी सर्व उमेदवार यापूर्वीही सामाजिक सेवा कार्य करत होतेच. आता जनतेचे प्रतिनिधी म्हणून ते सेवाकार्यात निश्चितच अग्रेसर राहतील. मालवण तालुक्याच्या विकासात त्यांचे बहुमोल योगदान राहील. असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.
फोटो : मालवणात महायुतीच्या विजया नंतर गुलालाची उधळण करतं जल्लोष करण्यात आला. (अमित खोत, गणेश गांवकर, मालवण )

