जय जय भराडी देवी....
श्री क्षेत्र आंगणेवाडी भराडी देवीचा आज जत्रोत्सव
मालवण|प्रतिनिधी:- नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या मालवण तालुक्यातील श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्थान आज लाखो भाविकांच्या हृदयात अलगद कोरले असून देवी भराडी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. म्हणूनच देवीच्या वार्षिकोत्सवात भक्तांचा मेळा आंगणेवाडी व्यापतो अन वाडीचा हा यात्रोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्हे तर कोकणचा महाउत्सव बनतो.

काही वर्षांपूर्वी केवळ आंगणेवाडी मर्यादित असलेला हा जत्रोत्सव आज लाखो भाविकांच्या उपस्थितीने महाराष्ट्रातील एक प्रमुख महाउत्सव बनला आहे. मंदिराभोवती असणारी यात्रा आता मंदिर परीसराच्या आजूबाजूला काही किलोमीटर पर्यंत विस्तारली आहे.
राजकीय नेते, सिने कलाकार व अन्य व्हीआयपी यांचीही गर्दी भाविकांबरोबरीने वाढतच चालली आहे. ही भक्तीची शक्ती आहे. देवीवर असलेली भाविकांची श्रद्धा आहे.
एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या युगातही भक्तीची शक्ती देव रूपातून भाविकांना बळ देते. हे श्रद्धेच्या 'तुलाभार' तराजूतील भक्तिभाव स्पष्ट करणारी आहे.
लाखोंच्या पटीत येणाऱ्या भाविकांना यात्रोत्सवात सुलभ व सुखकर दर्शन देणाऱ्या व भाविक हाच केंद्रबिंदू मानून अखंड सेवा देत यात्रा नियोजन यशस्वी करणाऱ्या आंगणे कुटुंबियांचा आदर्श देश पातळीवर घेऊन जाणारी ही यात्रा आहे.

शिस्त, सुलभता आणि सुरक्षा याची काळजी घेत आंगणे कुटुंबीय यात्रा संपली की पुढच्या वर्षीच्या यात्रा नियोजन करतात. हेच यात्रेच्या यशस्वितेचे गमक आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शेवटचे दोन महिने तर आंगणे कुटुंबीय दिवस रात्र यात्रा नियोजनात गुंतलेले असतात. देवीचा भक्त हा आपलाच पाहुणा मानून प्रत्येक भाविकांचे आदरातिथ्य केले जाते. यात्रा यशस्वीतेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या आंगणे कुटुंबियांच्या सेवाभावी वृत्तीचा न आटणारा झरा जणू भराडी आईच्या हृदयातूनच वाहतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हेवा वाटावा अश्या पद्धतीने यात्रेचे यशस्वी नियोजन आंगणे मंडळी करतात. भाविकांना देवीच्या सुलभ व जलद दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा, उड्डाणपूल उभारले जातात. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेराही बसविण्यात आलेले असतात. धुळीचा त्रास टाळण्यासाठी मंदिर परिसरात कार्पेट अंथरले असते. उन्हापासून आबालवृद्ध महिलांना दिलासा म्हणून मंडपाची व्याप्तीही दरवर्षी वाढत जाणारी असते. मंदिरातील फुलांची आरास व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई तर लक्षवेधी असते. डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते.
देवी नवसाला पावते हा देवीचा महिमा सर्वदूर पसरत असतो. दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सव भाविकांच्या गर्दीचे नवे उच्चांक गाठतो. मुंबईकर चाकरमानी लगबग व उत्साह काही वेगळाच असतो. त्यामुळे आंगणेवाडी आणि चाकरमानी असे अनोखे नाते यात्रोत्सवात दिसून येते.

आंगणे कुटुंबीय, मंडळ यासोबत ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासन शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था जणू आपलाच उत्सव आहे असे मानून यात्रा यशस्वीतेसाठी मेहनत घेतात. यात्रोत्सवासाठी जादा बसेस मुंबई, पुणेसह अन्य प्रांतांतून सोडल्या जातात. कोंकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या धावतात. यात्रा परिसरात प्रशासनाकडून जादा पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, वाहतूक व्यवस्था, रस्ता रुंदीकरण करून सुलभता आणली जाते. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवात लाखो भाविकांच्या उपस्थितीने व थाटलेल्या दुकाने या सर्वांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. भाविकांच्या मनोकामना पूर्तीबरोबरच व्यावसायिकांना देवी धनलक्ष्मी रूपाने प्रसन्न होते.
हौशे नवशे आणि गवशे यांच्यासाठी तर ही यात्रा खास ठरते. बच्चे कंपनीची तर यात्रेत धमाल असते. लहान थोर सर्वानाच जत्रा आपली वाटते. जत्रा सरते भाविक यात्रेतून निघतो मात्र डोळ्यात अन् मनाच्या गाभाऱ्यात देवीचे रुप अखंड ऊर्जेचा स्रोत बनून स्थिरावते.
शब्दांकन :अमित खोत, मालवण
9404457788

