सोमवार ९ फेब्रुवारी पहाटे ३ वाजल्या पासून १० दर्शन रांगामधून भाविकांना देवीचे दर्शन
मंगेश नलावडे | मालवण : लाखों भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव सोमवार ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. पहाटे ३ वाजल्या पासून एकूण १० दर्शन रांगामधून भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन सुलभ पद्धतीने घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रा नियोजन सुरु आहे. भाविकांना सुलभ आणि तत्पर देवीचे दर्शन घेता यावे यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणा दरवर्षी अहोरात्र मेहनत घेतात. त्याच पद्धतीने नियोजन व यात्रा तयारी सुरु आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून व्यावसाईकांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.
दुकाने सजायला लागली, आकाशपाळणा व बच्चेकंपनीची मोठमोठी खेळणी लावण्यास सुरुवात झाली असून आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. यात्रा कालावधीत यात्रा स्थळातील कणकवली आणि मालवण स्टँड कडून थेट मंदिरा पर्यंत दिव्यांग व्यक्तीना जाण्याची सोय यावर्षीही रिक्षाद्वारे करण्यात येणार आहे. असे मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी स्पष्ट केले आहे. पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, इंटरनेट, एटीएम, बस सेवा, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा मुबलक आणि सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागाना योग्य मार्गदर्शन आणि सुचाना देण्यात आल्या आहेत. सुसज्ज असे कायमस्वरूपी सुलभ प्रसाधनगृह आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसाधन गृहे ठीक ठिकाणी उपलब्ध केली आहेत. याचा वापर भाविकांना करता येणार आहे. आंगणेवाडी यात्रा स्पेशल जादा एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत त्याचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
अंगणेवाडी यात्रा प्लास्टिक मुक्त
आंगणेवाडी यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि प्रशासनाचा संकल्प आहे. त्यासाठी यात्रा पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींनी कापडी पिशव्या फक्त ओटी समान विक्रेत्यांना पुरवण्या बाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व व्यापारी व ग्राहकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून सहकार्य करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रेसाठी जादा रेल्वे गाडीची तरतूद
*यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा स्पेशल रेल्वेची सोय करण्यात आली आहे बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी रात्री ११: १५ वाजता ( २३: १५ ) गाडी ०९०५७ या क्रमांक ची रेल्वे वसई येथून सुटणार आहे. ही गाडी आंगणेवाडी पासून नजीक असणाऱ्या कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ, सावंतवाडी या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे असे आंगणे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.

