खाशाबा जाधव यांची जिद्द
महाराष्ट्र :- राज्य क्रीडा दिवस हा आपल्या क्रीडा इतिहासातील गौरवशाली परंपरेचे स्मरण करून देणारा दिवस आहे. या दिवशी आपण महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना जयंतीदिनी अभिवादन करतो आणि त्यांच्या संघर्षमय, पण प्रेरणादायी जीवनातून आजच्या खेळाडूंना दिशा देतो…
खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते होते. सातारा जिल्ह्यातील गोळेश्वरसारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या या कुस्तीपटूने अत्यंत तुटपुंज्या साधनांमध्ये प्रशिक्षण घेतले. ना आंतरराष्ट्रीय दर्जाची आखाडे, ना प्रशिक्षक, ना आर्थिक पाठबळ,फक्त मातीचा आखाडा, कठोर सराव आणि मनात असलेली देशासाठी पदक जिंकण्याची जिद्द…
१९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट गटात स्पर्धा सुरू असताना खाशाबा जाधव यांना पहिल्या काही लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्या काळात भारतीय खेळाडूंकडे आधुनिक आहार, फिजिओथेरपी किंवा पुनर्वसन सुविधा नव्हत्या. एका लढतीनंतर त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वेदना इतक्या तीव्र होत्या की डॉक्टरांनी पुढील लढत न खेळण्याचा सल्ला दिला…
पण खाशाबा जाधव यांनी तो सल्ला नाकारला.
“मी पदकासाठी नाही, माझ्या देशासाठी लढतो आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले…
पुढील लढतीसाठी ते जखमी अवस्थेतच आखाड्यात उतरले. वेदनांवर मात करत, प्रत्येक डावात त्यांनी अपार संयम, ताकद आणि रणनीती दाखवली. परदेशी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत शारीरिक सुविधा कमी असूनही त्यांनी मातीच्या आखाड्यात शिकलेली कौशल्ये जागतिक व्यासपीठावर सिद्ध केली. अखेर कांस्य पदकाच्या लढतीत त्यांनी आपला प्रतिस्पर्धी नमवत इतिहास रचला…
तो क्षण केवळ एका पदकाचा नव्हता, तर स्वतंत्र भारताच्या आत्मविश्वासाचा विजय होता…
ऑलिम्पिकसारखी ऐतिहासिक कामगिरी करूनही खाशाबा जाधव यांच्या आयुष्यात ऐश्वर्य आले नाही. अपेक्षित सन्मान आणि सुविधा त्यांना तात्काळ मिळाल्या नाहीत. त्यांनी पोलीस दलात नोकरी करून साधे, प्रामाणिक जीवन जगले. मात्र त्यांनी कधीही आपल्या संघर्षाची कुरबुर केली नाही. त्यांच्या वागण्यात नम्रता आणि विचारांमध्ये देशप्रेम होते…
उशिरा का होईना, भारत सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घेतली. अर्जुन पुरस्कार आणि मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आज महाराष्ट्रातील अनेक क्रीडा संस्था, पुरस्कार आणि संकुले त्यांच्या नावाने ओळखली जातात.हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे…
खाशाबा जाधव यांचे जीवन आपल्याला एक ठाम संदेश देते,
यश लगेच मिळत नाही. ते अपार कष्ट, संयम आणि प्रामाणिक प्रयत्नांतूनच मिळते.
अपयश, दुखापत, अडचणी या मार्गात येतात, पण जिद्द असेल, तर त्या अडचणी पायऱ्या बनतात…
आजच्या तरुण पिढीने सुविधा आहेत म्हणून आत्मसंतुष्ट न होता, खाशाबा जाधव यांच्यासारखी चिकाटी, शिस्त आणि देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ अंगी बाणवावी. क्रीडा क्षेत्र केवळ पदकांसाठी नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असते…
महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना विनम्र अभिवादन…
त्यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येक खेळाडूसाठी दीपस्तंभ ठरो…
-अजय मधुकर शिंदे
जिल्हाध्यक्ष
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा

