सिंधुदुर्ग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कर्नाटक राज्यातील परप्रांतीय नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्यविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
दि.१२/०१/२०२६ रोजी रात्री २१.२० च्या सुमारास वेंगुर्ला समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्यातील श्रीमती प्रमुक्ता सुनिल करकेरा, किडियूर, उडपी, कर्नाटक यांची नौका एकापर्निका ३, नों.क्र.IND-KA-२-MM-५४३९ ही महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात वेंगुर्ला समोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर ६ खलाशी होते. सदर नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.
अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने मा. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.
अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

