ग्रामस्थ गोपाळ धुरी यांची मागणी
मालवण : मालवण तालुक्यातील राठीवडे गावाला स्वतंत्र तलाठी नसल्याने ग्रामस्थ्यांची गैरसोय होत आहे. राठीवडे गावाच्या तलाठी पदाचा पदभार किर्लोस गावच्या तलाठ्यांकडे देण्यात आला असून कामांसाठी ग्रामस्थांना लांबचा प्रवास करावा लागत आहे, तर असगणी येथे तलाठी कार्यालयात कामासाठी ये - जा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे राठीवडे गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा किंवा राठीवडे गावात आठवड्यातून किमान एक दिवस तलाठी उपलब्ध करावेत अशी मागणी राठीवडे गावचे ग्रामस्थ गोपाळ धुरी यांनी जिल्हाधिकारी व मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राठीवडे गावचे तलाठी कार्यालय असगणी गावात असल्यामुळे शासकीय कामासाठी गावकरी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग यांना आपले शेती व इतर दैनंदिन कामकाज सोडून दूर असलेल्या असगणी या गावी जावे लागते. सदर गावातील कार्यालयात जाण्यासाठी फक्त एस. टी. बस चा पर्याय असून गावातून त्यामार्गे फक्त दोन किंवा तीन फेऱ्या असतात. सकाळी बसने गेल्यास परत येताना दुपारनंतर बस नाही, ती थेट संध्याकाळी चार वाजल्यानंतर मिळते. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तर राठीवडे गावाला तलाठीच नसून त्यांचा पदभार किर्लोस गावच्या तलाठी यांना दिला आहे. सदर गावात गेल्यावर जर ते उपलब्ध नसतील तर पूर्ण दिवस वाया जातो. आठवड्यातून एक दिवस तलाठी राठीवडे गावात उपलब्ध झाल्यास समस्त शेतकरी वर्ग व तमाम ज्येष्ठ नागरिक आपली कामे त्या दिवशी करून घेऊ शकतील. त्यामुळे सर्वांचा अमूल्य वेळही वाचून दिलासा मिळेल, राठीवडे गावात किमान एक हजार घरे असून या गावासाठी कायमस्वरूपी तलाठी असणे गरजेचे आहे, अशी मागणी गोपाळ धुरी यांनी केली असून याबाबत पालकमंत्री नितेश राणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधल्याचे म्हटले आहे.

राठीवडे गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा
