मच्छीमार्केट समस्या प्रश्नी भाजप गटनेत्या अन्वेशा आचरेकर व मच्छीविक्रेत्या महिलांनी नगराध्यक्षांची घेतली भेट
समस्या जाणून घेत नगराध्यक्ष यांची मच्छीविक्रेत्या महिलांसोबत सकारात्मक चर्चा
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मच्छीमार्केट येथे अधिक सोईसुविधा निर्माण करणार : नगराध्यक्षा
मालवण | प्रतिनिधी : मालवण मच्छीमार्केट मधील समस्या बाबत मच्छीविक्रेत्या महिलांसोबत भाजप गटनेत्या नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच पालिका प्रशासनाची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करतं निवेदन सादर केले.
दरम्यान नगराध्यक्षा म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी आपण मच्छीमार्केटची पाहाणी करून मच्छी विक्रेता महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्ही सर्व मच्छीविक्रेत्या महिलांसोबत असून त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या समस्या प्रधान्यांने सोडवल्या जातील. मच्छीमार्केट येथे अधिक सोईसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत. मच्छीमार्केट सोईसुविधासाठी एक कोटी निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मच्छीमार्केट येथे अपुऱ्या सोई सुविधा असताना पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेत्यांच्या बैठक व्यवस्था व साहित्य ठेवण्याच्या जागेबाबत नोटीस लावली. मुळात सोईसुविधा नसताना अश्या नोटीस प्रशासन अधिकारी यांनी लागल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे मच्छीविक्रेत्या महिला अध्यक्षा मनिषा जाधव, उपाध्यक्षा माधुरी खवणेकर, सुप्रिया केळूसकर यांसह अन्य मत्स्य विक्रेता महिला यांनी आपल्या समस्यां मांडण्यासाठी विश्वासाने नगराध्यक्षा यांची भेट घेतली. यावेळी भाजपा शहरअध्यक्षा नगरसेविका अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेविका सेजल परब, महानंदा खानोलकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, संमेश परब, भाई कासवकर उपस्थित होते.
मच्छी मार्केट मध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचेच आहे. साहित्य सर्वच ठिकाणी ठेवून अडचण होणार नाही याचीही काळजी गरजेची आहे. मात्र अपुऱ्या सोईमुळे मच्छीविक्रेत्या महिलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे. मंडईत फक्त ६९ अधिकृत ओटे आहेत तर विक्रेत्यांची संख्या २५० हून अधिक आहे. उर्वरित महिलांनी व्यवसाय कुठे करावा, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे समस्या अधिक आहेत. अश्या स्थितीत आरोग्य विभागाने जी नोटीस लावली आहे. त्यावरून विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना लाईट, दरवाजा, पाणी यासह ज्या सुविधा प्राधान्याने देणे गरजेचे आहे. त्या देण्यात याव्यात. यासाठीचा प्रस्ताव तयार करून द्यावा. यासाठी आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करू असे निवेदन गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांनी दिले.
मच्छीमार्केट मध्ये दरवाजा नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था, कचरा टाकण्यासाठी ट्रॉलीचा अभाव आणि सांडपाण्याच्या तुंबलेल्या गटारांमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसून संध्याकाळी पुरेशा प्रकाशाअभावी महिलांना अंधारात व्यवसाय करावा लागतो. असेही सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेअंती नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, प्रशासनाकडून कोणत्याही मच्छीविक्रेत्या महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्व समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली.
मासळी मंडईतील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. याबाबत सोईसुविधा प्रस्तावही तयार करून तो प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. मात्र तोपर्यंत तातडीने आवश्यक असलेल्या सुविधा आणि दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली जातील असे नगराध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर यांसह पालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनासही निवेदन देण्यात आले. तसेच नगराध्यक्षा यांनाही सर्व मच्छीविक्रेत्या महिला यांनी पुष्पगुछ दिला. यावेळी चर्चे दरम्यान नगरसेविका पुनम चव्हाण, नीना मुंबरकर, मेघा सावंत, दिपक पाटकर, सहदेव बापार्डेकर यांनीही मच्छीविक्रेत्या महिलांना मार्केट मध्ये अधिक सोईसुविधा देण्यासाठी सर्वजण कटीबद्ध असल्याचे सांगितले.
अमित खोत, मालवण

